दूध भेसळविरोधात कठोर कारवाई : अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे; जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती गठीत
परभणी : दूध भेसळविरोधात कठोर कारवाईचे आदेश अप्पर जिल्हाधिकारी तथा जिल्हास्तरीय तक्रार निवारण समितीचे अध्यक्ष डॉ.प्रताप काळे यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील ग्राहकास स्वच्छ व निर्भेळ, गुणवत्तापूर्वक दूध पुरवठा होण्याच्या अनुषंगाने तसेच दूध व दुग्धजन्य पदार्थात होणारी भेसळ रोखण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय तक्रार निवारण समिती गठीत करण्यात आली आहे. समितीचे सदस्य म्हणून अप्पर पोलीस अधीक्षक, सहाय्यक आयुक्त (अन्न) अन्न व औषध प्रशासन, जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, उपनियंत्रक वैध मापन शास्त्र तसेच जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी परभणी यांची सदस्य सचिव म्हणून नियुक्ती केली आहे. समितीमार्फत भेसळयुक्त दूध व दुग्धजन्य पदार्थ पुरवठा करणारे उत्पादक व वितरकावर नियंत्रण ठेवण्यासाठी व भेसळ आढळून आल्यास कायदेशीर तरतुदीनुसार कठोर कारवाई करण्यासाठी जिल्ह्यामध्ये दूध तपासणी मोहीम प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना डॉ.प्रताप काळे यांनी दिल्या आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील जनतेने दूध व दुग्धजन्य पदार्थामध्ये भेसळ होत असल्याचे आढळून आल्यास तसे जिल्हा समितीच्या निदर्शनास आणून द्याव्यात. यासाठी ७०२८९७५००१ आणि ९९२३६८९१६८ या टोल फ्री क्रमांक तक्रार नोंदविण्याचे आवाहन अपर जिल्हाधिकारी डॉ. काळे यांनी केले.