पाथरीत शिक्षकांचे अन्नत्याग आंदोलन सहाव्या दिवशीही सुरूच
मराठवाडा शिक्षक संघाचा सक्रिय पाठिंबा
परभणी : विविध मागण्यांसाठी शिक्षक समन्वय संघाच्या वतीने पाथरी (जि.परभणी) येथील तहसील कार्यालयासमोर तीन शिक्षकांनी सुरू असलेल्या अन्नत्याग आंदोलनाचा शनिवारी, २७ जुलै रोजी सहावा दिवस होता. दरम्यान, मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव आंदोलनात सक्रिय सहभागी होऊन पाठिंबा दिला असून आंदोलन यशस्वी करण्याचे आवाहन केले आहे.
शिक्षण मंत्र्यांनी घोषणा करूनही अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना विनाअट पुढील टप्पा लागू न झाल्याने या तिन्ही शिक्षकांनी प्राध्यापक दीपक कुलकर्णी, ज्ञानेश चव्हाण व प्राध्यापक रविकांत जोजरे या शिक्षकांनी २२ जुलैपासून पाथरी तहसील कार्यालयासमोर अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे. शुक्रवारी तिन्ही उपोषणार्थी शिक्षकांची तब्येत खालावली. शिक्षकांच्या रक्तातील साखर कमी झाल्याने त्यांना दवाखान्यात हलवण्याचे पत्र वैद्यकीय अधीक्षक डॉ.सुमंत वाघ यांनी शुक्रवारी पोलिस प्रशासनाला दिले आहे. दरम्यान, परभणी जिल्हा शिक्षक सेना उद्धव ठाकरे गट, परभणी जिल्हा रिपब्लिकन शिक्षक संघासह विविध संघटनांनी उपोषणास पाठिंबा दिला आहे. शनिवारी मराठवाडा शिक्षक संघाचे अध्यक्ष सूर्यकांत विश्वासराव, परभणी जिल्हा सचिव डी.के.देवकते, डॉ. संतोष मलसटवाड, अनंतकुमार विश्वंभर तसेच सेलू तालुक्यातील विविध शाळेतील शिक्षकांनी आंदोलनात सक्रिय सहभाग घेऊन पाठिंबा दर्शविला आहे.
♦खासदार जाधव यांचा उपोषणकर्त्यांशी संवाद
शुक्रवारी शिवसेना (उबाठा) पक्षाच्या वतीने पाठिंबा देण्यात आला. या वेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख रवींद्र धर्मे, तालुकाप्रमुख मुंजाभाऊ कोल्हे यांनी उपोषणस्थळी भेट देऊन उपोषणार्थी शिक्षकांची विचारपूस केली. यावेळी त्यांनी खासदार संजय जाधव यांच्याशी संपर्क साधून दिला. खासदार जाधव यांनी मोबाईलवरून उपोषणकर्त्या शिक्षकांशी चर्चा केली.
♦सरकारकडून शिक्षकांचा विश्वासघात : सुमारे पाव शतकापासून महाराष्ट्रातील हजारो शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विनावेतन वा अंशतः वेतनावर काम करीत आहेत. महाराष्ट्राच्या महान शैक्षणिक वारशाचा हा अपमान आहे. प्रचलित अनुदान सुत्रानुसार शंभर टक्के अनुदान देण्यात यावे. यासाठी मराठवाडा शिक्षक संघ सातत्याने आंदोलन करत आहे. मुंबईतील आझाद मैदानावर यासाठी मोठमोठी आंदोलने झाली. सरकारकडून शब्द देण्यात आले. परंतु प्रत्येक वेळी शिक्षकांचा विश्वासघात करण्यात आला, असे मराठवाडा शिक्षक संघाचे सरचिटणीस राजकुमार कदम यांनी दिलेल्या प्रसिद्ध पत्रकात म्हटले आहे.