आयुष्यमान आरोग्य मंदिर : मोरेगावचे आरोग्य केंद्र ३० महिन्यांपासून बंद
गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन : मूलभूत सोयीसुविधांचाही प्रश्न मार्गी लावण्याची मागणी
सेलू : ग्रामपंचायत मोरेगाव अंतर्गत गेल्या अडीच वर्षापासून बंद असलेले आरोग्य केंद्र आणि मंदिराजवळील महिला स्वच्छतागृह तत्काळ सुरू करावे तसेच गावातील पाणी, स्वच्छता, आरोग्य आदी मूलभूत सोयीसुविधेचा प्रश्न तत्काळ मार्गी लावावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यासंदर्भात तुकाराम दत्ताराव नाटकर यांनी गुरुवारी (एक ऑगस्ट) सेलू पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. गावामध्ये मागील अडीच वर्षा पूर्वी मंदिराजवळ महिलांसाठी शौचालय बांधले होते. परंतु ते अद्याप चालू करण्यात आलेले नाही. आरोग्य केंद्राचेसुद्धा बांधकाम पूर्ण झालेले असताना मागील तीन वर्षापासून बंद आहे. त्या आरोग्य केंद्राचा फायदा मोरेगावसह आजूबाजूला असणाऱ्या पाच-सात गावाला होतो. पावसाळ्याचे दिवस असल्यामुळे रोगराई वाढते. डेंग्यू, कावीळ, हगवन, हिवताप आदी आजाराची तीव्रता आहे. त्यामुळे आरोग्य केंद्र व स्वच्छता गृह तत्काळ सुरु करावे तसेच भर पावसाळ्यत गावात सांड पाण्याचा प्रश्न आहे. तो निकाली काढावा. रस्त्यावर घाण पाणी साचून राहत आहे. त्या रस्त्यावरून शालेय विद्यार्थी ये-जा करतात. गावातील सरपंच गावात राहत नाहीत. फोन उचलत नाहीत वापस लावत नाहीत.ग्रामसेवक फोन बंद करून ठेवतात असा आरोप निवेदनात करण्यात आला आहे. आम्ही न्याय कुणाकडे मागायचा, असा सवालही उपस्थित केला आहे.