औंढा नागनाथ : शेकडो भाविकांनी घेतले श्री नागनाथांचे दर्शन

औंढा नागनाथ : शेकडो भाविकांनी घेतले श्री नागनाथांचे दर्शन

पहिल्याच श्रावणी सोमवारी शिवालये गर्दीने फुलली

औंढा नागनाथ : शेकडो भाविकांनी घेतले श्री नागनाथांचे दर्शन

शिवशंकर निरगुडे, हिंगोली : देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे ‘हर हर महादेव’ आणि ‘बम बम भोले’ च्या गजरात शेकडो भाविकांनी सोमवारी पहाटे दोन वाजल्यापासून प्रभु श्री नागनाथांच्या दर्शनासाठी अलोट गर्दी केली होती. विशेषपास घेऊनही भाविकांच्या रांगा कायम होत्या. संस्थानच्या वतीने भाविकांसाठी पाच क्विंटल साबुदाना खिचडीचा प्रसाद दिला जात आहे.

देशातील आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे रविवारी मध्यरात्री साडेबारा वाजता संस्थानचे अध्यक्ष तहसीलदार हरीष गाढे तसेच वकिल संघाचे अध्यक्ष ॲड.शिवशंकर वाबळे यांच्या हस्ते महापूजा करण्यात आली. यावेळी संस्थानचे मुख्यपुजारी तुळजादास भोपी, हरिहर भोपी, कृष्णा ऋषी, बंडू पंडीत, पद्माक्ष पाठक, सागर पाठक, धनंजय ऋषी, राजू दीक्षित, ऋषीकेश दीक्षित, जीवन ऋषी, योगेश पाठक यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते. पहाटे दोन वाजल्यापासून मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले होते.

भाविकांच्या लांबच लांब रांगा

श्री नागनाथ दर्शनासाठी पहाटे पासूनच भाविकांनी मंदिराच्या पश्चिमद्वारा पासून रांगा लावल्या होत्या. मंदिर दर्शनासाठी खुले करताच भाविकांची मोठी गर्दी झाली होती. दर्शन रांगेत हर हर महादेवचा गजर सुरु होता. सकाळी दुपारी वाजेपर्यंत सुमारे ५० हजारापेक्षा अधिक भाविकांनी नागनाथाचे दर्शन घेतल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या ठिकाणी येणाऱ्या भाविकांसाठी साबुदाना खिचडीचा प्रसाद वाटप केला जात आहे.

चोख पोलिस बंदोबस्त

हिंगोली, परभणी, नांदेड जिल्हयातील भाविक मिळेल त्या वाहनाने औंढा नागनाथ येथे येत आहेत. सकाळी १२ वाजेपर्यंत सुमारे १५ हजारापेक्षा अधिक भाविक दर्शनरांगेत असल्यामुळे अभिषेक बंद करण्यात आले. पहिल्या श्रावण सोमवारी नागनाथाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या लक्षात घेता पोलिस अधिक्षक जी.‌श्रीधर यांच्या मार्गदर्शनाखाली सहा पोलिस निरीक्षक, २१ पोलिस अधिकारी, १२० पुरुष व ४० महिला पोलिस कर्मचारी व १२० होमगार्ड व एक दंगल पथक, एक बॉम्ब शोधक पथक व राज्य राखीव दलाची एक तुकडी असा चोख पोलिस बंदोबस्त पोलिस प्रशासनाच्या वतीने परिसरात तैनात करण्यात आला आहे. मंदिर संस्थानचे अधीक्षक वैजनाथ पवार, व्यवस्थापक सुरेंद्र डफळ, गणेश उदगीरे, कृष्णा पाटील, नागेश माने, बबन सोनुने आदींसह नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव व दोन महसूल कर्मचारी मंदिर परिसरात विशेष लक्ष ठेवून राहणार आहेत.

परभणीतील शिवालये फुलली

परभणी : पहिल्याच श्रावणी सोमवारी परभणी जिल्ह्यातील ठिकठिकाणच्या शिवालयामध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. परभणी शहरातील नांदखेडा रोडवरील प्रसिद्ध श्री पारदेश्वर महादेव मंदिरात सोमवारी शिव आराधनेस प्रारंभ झाला. गंगाखेड येथील प्राचीन अंधारा महादेव व मन्नाथ मंदिरात भाविकांची गर्दी झाली होती. सेलू येथील श्री शंकरलिंग मंदिर, श्रीराम मंदिर, श्री साईबाबा मंदिर परिसरातील श्री महेश्वर, हातनूर येथील श्री नागनाथ भगवान, वालूर येथील श्री वाल्मिकेश्वर मंदिर तसेच निरवाडी, कुंडी, केदारवाकडी, ढेंगळी पिंपळगाव येथील शिवालयांसह गावोगावी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!