विधानसभा निवडणूक : प्रारूप मतदारयादी प्रसिद्ध; ७ हजार ८६५ मतदारांची भर
परभणी : विधानसभा निवडणुकीसाठी मंगळवारी, सहा ऑगस्टरोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध झाली असून त्या अनुषंगाने सर्व राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे व उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
यावेळी जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्षाचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी गावडे यांनी जिल्ह्यामध्ये लोकसभा निवडणुका झाल्यानंतर ४२ नवीन मतदान केंद्रांना निवडणूक आयोगाकडून मंजुरी मिळाली असल्याने १ हजार ६२३ मतदान केंद्र आज रोजी अस्तित्वात आहेत. त्याचप्रमाणे लोकसभा लोकसभा निवडणुकीच्या वेळी अस्तित्वात असलेल्या मतदारांमध्ये ७ हजार ८६५ मतदारांची भर पडलेली असून आज रोजी जिल्ह्याची एकूण मतदारसंख्या पंधरा लाख चार हजार एकशे एकसष्ठ झालेली आहे. मतदार याद्या जिल्ह्यातील एकूण १ हजार ६२३ मतदान केंद्रावर आज रोजी प्रसिद्ध केल्या असून सर्वांना त्या पाहण्यासाठी उपलब्ध आहेत. जिल्हाधिकारी गावडे यांनी जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांना मतदान केंद्रावर मतदारांची नावे बरोबर असल्याबाबत खात्री करण्यासाठी बी एल ए नेमण्याची विनंती केली. त्याचप्रमाणे सर्व जनतेने आपापल्या मतदान केंद्रावर आपली नावे मतदार यादीत असल्याबाबत खात्री करण्याची विनंती केली. मतदार यादीबाबत काही आक्षेप असल्यास दिनांक ६ ते २० ऑगस्ट या कालावधीत दावे हरकती मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे अथवा बीएललो कडे सादर करण्याबाबत कळविले. त्याचप्रमाणे आगामी काळात होणार्या विधानसभेसाठी वापरल्या जाणार्या ईव्हीएम मशीनची प्रथमस्तरीय तपासणी औद्योगिक वसाहतीतील वखार महामंडळाच्या गोदामामध्ये चालू असून त्या ठिकाणी सर्व राजकीय पक्षाच्या प्राधिकृत प्रतिनिधींनी भेट देऊन ईव्हीएम मशीन संबंधी काही शंका असल्यास त्यांचे निरसन करून ईव्हीएमची कार्यप्रणाली समजून घेण्याबाबत विनंती केली.