पारडीच्या जिल्हा परिषद शाळेची नाटिका सर्वप्रथम

पारडीच्या जिल्हा परिषद शाळेची नाटिका सर्वप्रथम

सेलू तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धा : नूतन विद्यालयाची नाटिका द्वितीय 

सेलू : सेलू तालुकास्तरीय विज्ञान नाट्योत्सव स्पर्धेत‌ पारडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेने सादर केलेल्या ‘एआय आणि समाज’ या नाटिकेने सर्वप्रथम क्रमांक मिळविला. या नाटिकेची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

नूतन विद्यालयाच्या ‘ जल हेच जीवन ‘ या नाटिकेने व्दितीय क्रमांक मिळविला. केशवराज बाबासाहेब विद्यालयाने तृतीय, तर एलकेआर रोडगे प्रिन्स इंग्लिश स्कूलने उत्तेजनार्थ पारितोषिक मिळविले. पंचायत समिती शिक्षण विभाग आणि गटसाधन केंद्राच्या वतीने गुरूवारी (८ ऑगस्ट) गटशिक्षणाधिकारी उमेश राऊत, उपशिक्षणाधिकारी गजानन वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली नूतन विद्यालयात या स्पर्धा आयोजिण्यात आल्या होत्या.  तालुक्यातील सोळा शाळांनी सहभाग घेतला होता. उद्घाटनप्रसंगी केंद्रप्रमुख एकनाथ जाधव, मुख्याध्यापक संतोष पाटील, परीक्षक एन.एम.देशपांडे, प्राध्यापक किशोर विश्वमित्रे, गौतम सूर्यवंशी, समन्वयक सुनीता काळे, अंजली पद्माकर, अश्विनी आम्ले आदींची उपस्थिती होती. प्रथम क्रमांकप्राप्त पारडीच्या शाळेने ‘आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि समाज’ ही नाटिका सादर केली. एआय साधनांचा उपयोग करून माणसांनी केलेली प्रगती आणि अतिरेकी वापराने कुटुंबात व समाजात होणारे दुष्परिणाम यावर नाटिकेतून प्रकाश टाकण्यात आला. साक्षी राठोड, खुशी राठोड, कोमल आडे, सचिन राठोड, गोविंद जाधव, कल्याणी आडे, आश्र्विनी आडे या बालकलाकारांनी भूमिका बजावल्या. मार्गदर्शन मुख्याध्यापक डी.के.कुलकर्णी, लेखन गणेश अकलोड, तर दिग्दर्शन, संगीत व नेपथ्य युवराज माने यांनी केले. श्याम रुपणर, संजय काकडे, योगेश काळे यांनी साह्य केले. व्दितीय क्रमांकप्राप्त नूतन विद्यालयाने सुरेश हिवाळे दिग्दर्शित आणि आदिती अंबेकर लिखित ‘जल हेच जीवन’ नाटिका सादर केली. अक्षरा बोकन, दुर्गा मगर, सान्वी हेलसकर, मृण्मयी इक्कर, शिवानी डहाळे, श्रीनिवास देवकर, तीर्थेश संघई, शाश्वत संघई या बालकलाकारांनी भूमिका बजावल्या. संगीत सच्चिदानंद डाखोरे, नेपथ्य : फुलसिंग गावित, तर अश्विनी पटाईत, केशव डहाळे यांनी साह्य केले. विजेत्या संघातील कलाकारांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक अंजली पद्माकर यांनी केले. सूत्रसंचालन काशिनाथ पल्लेवाड, सुरेश हिवाळे यांनी केले. सुनीता काळे यांनी आभार मानले.

पारडीच्या जिल्हा परिषद शाळेची नाटिका सर्वप्रथम

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!