अभ्यासाबरोबरच व्यावहारिक ज्ञान गरजेचे : संतोष दिवाण

अभ्यासाबरोबरच व्यावहारिक ज्ञान गरजेचे : संतोष दिवाण

सेलूतील श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयातील गुणवंतांचा सत्कार 

सेलू : प्रयत्न, त्याग व संघर्ष या त्रिसूत्रीवरच विद्यार्थ्यांचे यश अवलंबूनआहे. भविष्यातील क्षमता पूर्ण करण्याची जबाबदारी स्वतःलाच पूर्ण करावी लागते. याची जाणीव विद्यार्थ्यांनी ठेवावी त्यासाठी अभ्यासाबरोबरच व्यावहारिक ज्ञान देखील अवगत करणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन पाथरी येथील शंकरराव चव्हाण विद्यालयाचे मुख्याध्यापक संतोष दिवाण यांनी केशवराज बाबासाहेब विद्यालयात आयोजित गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून बोलतांना केले.

येथील केशवराज विद्यालयातील दहावीतील गुणवंत तसेच विभागातील विविध स्पर्धा परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष ॲड.अनिरुद्ध जोशी होते. यावेळी व्यासपीठावर संस्थेचे सचिव महेशराव खारकर, संस्थापक सदस्य अशोकराव चामणीकर, मुख्याध्यापक सिद्धार्थ एडके, बालासाहेब हळणे, संचालक जयंतराव दिग्रसकर, ॲड.किशोर जवळेकर, विषुपंत शेरे, प्रवीण माणकेश्वर यांची उपस्थिती होती.

मान्यवरांच्या हस्ते सरस्वती व स्वर्गीय ॲड.वसंतराव खारकर यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करण्यात आले. मुख्याध्यापक सिद्धार्थ एडके, शिक्षिका अलका धर्माधिकारी व सेवक विठ्ठल काळे तसेच विद्यार्थ्यांनी स्वागत गीत सादर केले. नरेश पाटील यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा तसेच विविध स्पर्धा परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्याचा प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला. योगेश ढवारे यांनी यादी वाचन केले. सिद्धार्थ एडके यांनी प्रास्ताविकात कार्यक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. महेशराव खारकर, अशोकराव चामणीकर यांनी मनोगतात गुणवंत विद्यार्थ्यांचे कौतुक करून शुभेच्छा दिल्या. यावेळी बोलतांना दिवाण पुढे म्हणाले की, नापास झालेल्या विद्यार्थ्यांनी खचून न जाता सतत पुढे जाण्याचा प्रयत्न करावा. तसेच पारितोषिक मिळालेल्या विद्यार्थ्यांची जबाबदारी वाढली आहे. विद्यार्थ्यांनी आपले ध्येय ठरवले पाहिजे. शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांचा कल ओळखून त्याला योग्य मार्गदर्शन करावे. प्रयत्न, त्याग व संघर्ष या त्रिसूत्रीवरच विद्यार्थ्यांचे यश अवलंबूनआहे. त्यांनी अभ्यासाबरोबरच व्यावहारिक ज्ञान देखील अवगत करावे. प्रत्येकाला वय वाढल्यानंतर आपल्यामध्ये असलेली क्षमता पूर्ण करण्याची जबाबदारी स्वतःलाच पूर्ण करावी लागते. याची जाणीव विद्यार्थ्यांनी ठेवावी व तसे ध्येय ठेऊन प्रयत्न करावे. विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर कमी करावा. पूर्वीच्या चांदव्याची जागा आता मोबाईल मधील बडबड गीताने घेतली आहे. ही बाब अत्यंत घातक आहे. याची जाणीव पालकांनी ठेवावी तसेच सुसंस्कारित पिढी तयार व्हावी ही काळाची गरज आहे. ज्ञान व आरोग्य संपन्न असे जीवन विद्यार्थ्यानी जगले पाहिजे. कारण गुणातून व मिळवलेल्या ज्ञानातूनच विद्यार्थ्यांची खरी पात्रता घडत असते. विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच एखादी कला अवगत करावी. त्यातूनच रोजगार उपलब्ध करता येऊ शकतो. सर्वांनाच नौकरी मिळू शकणार नाही. शिक्षकांनी देखील केवळ शिक्षक न राहता विद्यार्थ्यांचे पालक बनावे. विद्यार्थ्यांनी आईवडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी सतत प्रयत्न करावेत आणि आई वडीलासोबतच शिक्षकांच्या मेहनतीचे चीज विद्यार्थ्यांनी करावे. यासाठी अविरत श्रम करणे आवश्यक आहे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

पुढील वर्षी गणित विषयात १०० पैकी १०० गुण घेणाऱ्या विद्यार्थ्यास ३००१/- रुपयांचे परितोषक संतोष दिवाण यांनी यावेळी जाहीर केले. दरवर्षी दहावी परीक्षेत शाळेतून प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यास २००१/- रुपयांचे परितोषक जेष्ठ पत्रकार नारायण पाटील यांनी यावेळी जाहीर केले. सूत्रसंचालन जयश्री सोन्नेकर यांनी केले, तर योगेश ढवारे यांनी आभार मानले.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!