ट्रॅक्टरच्या हेडखाली तरुणाचा मृत्यू
रेल्वे मार्गाच्या दुरुस्ती वेळी पावडे हादगाव शिवारातील घटना
सेलू : रेल्वेचे रूळ बदल असताना ट्रॅक्टरच्या हेडखाली आल्याने झालेल्या अपघातात एका ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना सेलू ते सातोना रेल्वे स्टेशन दरम्यान पावडे हादगाव परिसरात घडली आहे. रेल्वे रुळाचे काम ट्रॅक्टर हेडच्या साह्याने करत असताना ट्रॅक्टर चालक सुरेश प्रल्हाद जाधव (वय ३२ वर्षे रा. वरफळ ता.परतूर जि. जालना) येथील तरुणाच्या अंगावर हेड पडून त्याचा जागीच मृत्यू झाला. ही घटना रविवार ११ ऑगस्ट रोजी दुपारी ११ च्या नंतर घडली आहे. याबाबत पोलीसांनी दिलेली माहिती प्रमाणे सेलू- सातोना रेल्वे स्टेशन दरम्यान पावडे हादगाव परिसरात रेल्वे मार्गाच्या दुरुस्तीचे काम सुरू असून या कामावर रेल्वेचे रुळ ट्रॅक्टर हेडच्या साह्याने बदलताना हा अपघात झाला. या घटनेची माहिती पोलीसांना कळताच पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, माधव कांगणे, शेख इब्राहिम यांनी घटनास्थळी भेट देऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी सेलू उपजिल्हा रुग्णालयात पाठविला आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलीसात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलीसांच्या वतीने देण्यात आली आहे.