मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना निरंतर सुरू राहणार
महिला संवाद मेळाव्यात मंत्री आदिती तटकरे यांची माहिती
परभणी : ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’ ही काही मर्यादित काळीसाठीची योजना नसून ती निरंतर चालणार आहे. या योजनेत किमान अडीच कोटी महिला आपला सहभाग नोंदवतील. आतापर्यंत १ कोटी ४५ लाख महिलांनी या योजनेत सहभाग नोंंदवला आहे. अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी रविवारी (११ ऑगस्ट ) दिली. योजनेचा प्रचार आणि प्रसार व्हावा यासाठी परभणी येथील राजलक्ष्मी मंगल कार्यालयात आयोजित महिला संवाद मेळाव्यात मार्गदर्शन करताना मंत्री तटकरे बोलत होत्या.
या योजनेला महिलांचा मोठा प्रतिसाद मिळत असल्यानेच विरोधक गैरसमज पसरवत आहेत, असा आरोप मंत्री तटकरे यांनी यावेळी केला आहे. मेळाव्याला युवा प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे, आमदार मेघना बोर्डीकर, आमदार राजेश विटेकर, आनंद भरोसे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्षा भावना नखाते, माजी महापौर प्रताप देशमुख, नंदाताई राठोड, दशरथ सूर्यवंशी, चंद्रकांत राठोड, कृष्णा तळेकर, आदींंची प्रमुख उपस्थिती होती. मेळाव्याला महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.