सुंदर माझी राखी : विद्यार्थ्यांना सहज शिक्षण द्यावे : ध्रुव साकोरे
सेलूतील नूतन विद्यालयात ‘सुंदर माझी राखी’ स्पर्धेचे बक्षीस वितरण
सुंदर माझी राखी स्पर्धेतील विजेत्यांची नावे : पाचवी ते सातवी :प्रथम श्रीकांत अशोक चौळ, व्दितीय तनपुरे कृष्णा रामेश्वर, तृतीय : शिवानी गुलाब सानप, मेघना मंगेश हुगे, उत्तेजनार्थ साक्षी अंबादास इघवे, आठवी ते दहावी : प्रथम कार्तिकी संजय गोर, द्वितीय – तेजस्वी सतिश सोलापूरे, तृतीय विश्वजीत रामेश्वर साखरे, उत्तेजनार्थ सान्वी बाबासाहेब हेलसकर, अंतरा विजय बोकन
सेलू : ‘सहज-शिक्षण’ शिक्षणासाठी गुरूला स्वतः ‘सहज-शिक्षक’ व्हावे लागेल. ‘आपण शिक्षण घेत आहोत’ असा भासच विद्यार्थ्याला होणार नाही, अशी सहज शिक्षणाची रचना हवी. आज जग वेगाने बदलत आहे. जगाचा भौतिक विकास होतांना आपल्याला दिसतं आहे. परंतु या बदलाचा सुसंस्कृत भाग आपल्याला व्हावे लागेल. नवे ते अंगिकारावं लागेल. नवीन तंत्रज्ञान हे शिक्षण, आरोग्य, शेती अन् रोजगारात वापरावे लागेल. विद्यार्थ्यांनी कौशल्य आत्मसात करुन आपली प्रगती साधावी, असे मत ध्रुव दिपक साकोरे यांनी व्यक्त केले.
नूतन विद्यालयातील चित्रकला विभागाच्या वतीने रक्षाबंधनानिमित्त आयोजित केलेल्या सुंदर माझी राखी स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात सोमवारी, १९ ऑगस्ट रोजी प्रमुख पाहुणे म्हणून साकोरे बोलत होते. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संतोष पाटील होते. व्यासपीठावर उपमुख्याध्यापक किरण देशपांडे, पर्यवेक्षक देविदास सोन्नेकर, आदेश आगजाळ, आदित्य अंभोरे, मनोज वाघ, विराज बोर्डीकर, अजित मोगल यांची उपस्थिती होती.
शिक्षणासाठी लंडन मध्ये असलेल्या ध्रुव साकोरे म्हणाले की, भारतीय संस्कृती ही जगात श्रेष्ठ आहे. आपल्या सण उत्सव, परंपरा, संस्कृतीचा वारसा आपण जपत असताना आपण चांगले संस्कार व शिक्षणातून आपण आपला उध्दार करु शकतो, असे ते म्हणाले. पुढे बोलतांना ध्रुव साकोरे म्हणाले की, विद्यार्थ्याला ‘तर्क-शक्ति’ मूळचीच असते. तिला वारंवार खाद्य मिळेल, असे प्रसंग आणून द्यायचे, इतकेच शिक्षणाचे कार्य आहे. सर्व शास्त्रे, कला, सद्गुण यांची बीजे माणसामध्ये स्वयंभूच असतात. ती आपणास फक्त दिसत नाहीत. पण दिसत नसते, म्हणून ते नसतेच, असे मात्र होत नाही. मनुष्य स्वभावतःच दुष्ट नसतो. तसे असते तर शिक्षणाला आशाच राहिली नसती. वस्तूपासून तिचा मूळचा स्वभाव दूर करणे तर्कदृष्ट्या अशक्य असल्यामुळे, मानवी स्वभाव मूळचाच दुष्ट असेल तर त्याला सुधारण्याचे सर्व प्रयत्न फुकट जातील. यावेळी स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण आणि शालेय उपयोगी शैक्षणिक साहित्य देऊन गुणगौरव करण्यात आला. प्रास्ताविक चित्रकला विभाग प्रमुख रामकीशन कटारे यांनी केले. सुत्रसंचालन बाळू बुधवंत तर फुलसिंग गावित यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संगीत विभाग प्रमुख सच्चिदानंद डाखोरे, सुरेश हिवाळे, प्रशांत नाईक, डॉ.काशिनाथ पल्लेवाड, आरती कदम, सोनाली शेरे यांनी पुढाकार घेतला.