सर्पदंशाने १५ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू
सेलू तालुक्यातील डिग्रस बरसाले येथील घटना
सेलू : सेलू तालुक्यातील डिग्रस बरसाले येथील रामेश्वर नंदू तारडे (वय १५ वर्ष) या शाळकरी विद्यार्थ्याचा शुक्रवारी (२३ ऑगस्ट) सर्पदंशाने मृत्यू झाला. मृत रामेश्वर तारडे हा सेलू येथील नूतन शाळेत इयत्ता नववीमध्ये शिक्षण घेत होता. शुक्रवारी तो डिग्रस बरसाले येथील घरीच झोपलेला असताना पहाटे चारच्या सुमारास त्याला साप चावला. घरातील मोठ्या आवाजाने शेजारीपाजारी गोळा झाले. साप चावल्याचे लक्षात येताच रामेश्वरला तातडीने सेलू येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु, उपचार सुरू असताना. सकाळी पावणे सात वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दुपारी रामेश्वर याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, याप्रकरणी दत्ता तारडे यांनी शुक्रवारी सेलू पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादात रामेश्वरची स्पर्शदशांने मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. पोलिस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार ज्ञानेश्वर लांगर तपास करीत आहेत. दरम्यान रामेश्वर याच्या आकस्मिक मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.