दानपेटीवर डल्ला मारणारा आरोपी ताब्यात; सेलू पोलिसांची जलद कारवाई

दानपेटीवर डल्ला मारणारा आरोपी ताब्यात; सेलू पोलिसांची जलद कारवाई

सेलू : तालुक्यातील वालूर येथील बालाजी मंदिर आणि कालिकादेवी मंदिरातील दानपेट्या फोडून अंदाजे 45 हजार रुपये चोरी करणारा आरोपी अखेर पोलिसांच्या ताब्यात आला आहे. सेलू पोलिसांनी केलेल्या तत्पर कारवाईमुळे गुन्ह्यातील आरोपीला अटक करण्यात यश आले. दानपेटी फोडल्याची घटना दिनांक 23/8/24 च्या रात्री 09.00 ते दिनांक 24/8/24 रोजी 06.00 दरम्यान घडली. अज्ञात चोरट्याने बालाजी मंदिर वालूर येथे कुलूप तोडून मंदिरात प्रवेश केला आणि दानपेटी फोडून अंदाजे 30 हजार रुपये लंपास केले. याच रात्री काही अंतरावर असलेल्या कालिकादेवी मंदिराचे छतावरून प्रवेश करून, तेथेही दानपेटी फोडून अंदाजे 15 हजार रुपये चोरी करण्यात आले. या चोरीबाबत सेलू पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आली. तक्रारीच्या आधारे गुन्हा क्रमांक 436/2024 अंतर्गत भारतीय दंड संहितेच्या कलम 305 आणि 331(4) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीचा शोध घेण्यासाठी सेलू पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके तयार करण्यात आली. शोधमोहीमेदरम्यान, मेघराज लक्ष्मण दवंडे (वय 20 वर्षे, रा. कुपटा, ता. सेलू, जि. परभणी) या संशयित इसमाला ताब्यात घेण्यात आले. चौकशीदरम्यान, त्याने गुन्हा केल्याचे कबूल केले. त्यानुसार, आरोपीला दिनांक 26/08/24 रोजी अटक करण्यात आली आणि त्याला माननीय न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. पोलिसांच्या या जलद आणि प्रभावी कारवाईमुळे मंदिरातील चोरीचे रहस्य उलगडले आहे, तसेच परिसरातील नागरिकांनी पोलिसांचे कौतुक केले आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!