शिक्षकांसाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रशिक्षण कार्यक्रम; प्रिन्स सीबीएसई स्कूलचा उपक्रम
सेलू : श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे यांच्या संकल्पनेतून, श्रीराम प्रतिष्ठानच्या अंतर्गत सर्व शिक्षकवर्गासाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे मंगळवारी, २७ ऑगस्ट रोजी आयोजन करण्यात आले. माजी विद्यार्थी हरीश पंडितकर यांच्या मार्फत “पावर पॉइंट प्रेझेंटेशन” आणि “आर्टिफिशियल इंटेलिजन्स” या दोन महत्त्वाच्या विषयांवर प्रशिक्षण देण्यात आले.
प्रशिक्षणादरम्यान Canva या इंटरनेटवरील सर्वोत्कृष्ट डिझाइनिंग टूलची माहिती देण्यात आली. उपलब्ध रेडीमेड टेम्प्लेट्स वापरून कमी वेळेत सुंदर ग्राफिक्स आणि प्रेझेंटेशन तयार करण्याचे तंत्र शिकवले गेले. यामध्ये शिक्षकांनी ३ ते ४ मिनिटांत लोगो डिझाइन, डॉक्यूमेंट, पीपीटी, आणि लेसन प्लॅन कसे तयार करावे, याचे सखोल प्रशिक्षण घेतले. तसेच, आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) प्रशिक्षणाद्वारे शिक्षकांना AI च्या मदतीने माहिती शोधण्याचे आणि AI च्या माध्यमातून चित्रे कशी तयार करायची याचे मार्गदर्शन करण्यात आले. या उपक्रमामुळे शिक्षकवर्गाला आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर कसा करावा याबाबत नव्या कल्पना आणि कौशल्ये आत्मसात करण्याची संधी मिळाली.
कार्यक्रमाला शिक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला, आणि त्यांनी या नव्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने शिक्षण अधिक सुस्पष्ट आणि प्रभावी कसे करता येईल याबद्दल आनंद व्यक्त केला.