प्रसुतीनंतर तब्येत बिघडली; २० वर्षीय महिलेचा मृत्यू
सेलू : २० वर्षीय आरती सारंग फुफाटे हिचा प्रसुतीनंतर तब्येत बिघडल्याने मृत्यू झाला आहे. ही घटना २७ ऑगस्ट २०२४ रोजी सकाळी ७:२० वाजता घडली. मृत महिलेच्या वडिलांनी या घटनेची तक्रार दाखल केली आहे.
मयत आरती फुफाटे (वय २० वर्षे) हिचे शिक्षण इयत्ता आठवीपर्यंत झाले होते, आणि ती जामगया, तालुका सेनगाव, जिल्हा हिंगोली येथील रहिवासी असून किन्होळा ता.मानवत येथे सध्या राहत होती. ती प्रसुतीसाठी सेलू येथे आली होती, जिथे तिची सिझर शस्त्रक्रिया झाली आणि तिला मुलगी झाली. मात्र, प्रसुतीनंतर तिची तब्येत अचानक खालावली. त्यामुळे तिला तातडीने परभणी येथील सरकारी रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे डॉक्टरांनी तपासून तिला मृत घोषित केले. या घटनेची तक्रार विठल नामदेव चिभडे (वय ४० वर्षे, रा.कवडधन) यांनी पोलिसांत दाखल केली असून, पोलिस उपनिरीक्षक निरीक्षक पठाण यांनी तक्रार दाखल करून घेतली असून पोलिस हवालदार श्री सूर्यवंशी यांनी तपास सुरू केला आहे.