नादब्रह्म संगीत मैफिलीला श्रोत्यांचा मोठा प्रतिसाद
सेलू : नादब्रह्म संगीत विद्यालयाच्या वतीने पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित संगीत मैफिलाला श्रोत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. नूतन विद्यालयाच्या कै. रा. ब. गिल्डा सभागृहात रविवार, २५ ऑगस्ट रोजी संगीत समारोह आणि मैफिलीचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नूतन विद्यालय शिक्षण संस्थेचे सचिव डॉ.विनायकराव कोठेकर उपस्थित होते. व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य डॉ. शरद कुलकर्णी, नादब्रह्म संगीत विद्यालयाचे यशवंतराव चारठाणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी बोलतांना, डॉ.विनायकराव कोठेकर म्हणाले की; स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीय शास्त्रीय संगीताच्या उत्कार्षासाठी पंडित विष्णू दिगंबर पलुस्कर यांचा मोठा वाटा मानला जातो. त्यांच्या संगीत साधनेला त्याग, संघर्ष, उपेक्षा, कठोर परिश्रम आणि उपासनेची झालर होती, आणि त्यामुळे ते भारतीय शास्त्रीय संगीत साधकांसाठी प्रेरणादायी आहेत.
कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली. यानंतर शरण्या मोहकरे, मनवा देशमुख आणि यथार्थ गवलवाड यांनी सादर केलेल्या राग यमन कल्याणने श्रोत्यांची दाद मिळवली. ‘सुर ज्यांचा श्वास होता, संगीताची साधना’ या कै.पंडित हरिभाऊ चारठाणकर यांच्या सांगितीक जीवनावर आधारित गिताने श्रोत्यांची वाहवा मिळवली. सिमा सुक्ते, सुषमा दामा आणि आरोही ओगले यांनी राग भूप सादर केला, तर सुरेखा चारठाणकर यांनी ‘कशासाठी येवू देवा तुझ्या मंदिरात’ हा अभंग गायला. साईश भोसीकर यांनी राग तिलक कामोद सादर केला, आणि अलका धर्माधिकारी यांनी ‘केव्हा तरी पहाटे, रात उलटून गेली’ या गीताने श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. कार्यक्रमाचा समारोप यशवंतराव चारठाणकर यांनी गायलेल्या राग मेघ मल्हारने केला. शिवाजीराव पाठक आणि शंतनु पाठक यांनी संगीत साथ केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुभाष मोहकरे यांनी केले, तर नवनाथ गवलवाड यांनी आभार मानले.
संगीत मैफिलीच्या यशस्वीतेसाठी गंगाधर कान्हेकर, प्रमोद देशमुख, संतोष चारठाणकर, वैष्णवी बोठे, रंजना चिकाळकर, केशव डहाळे आणि रामपुरकर यांनी परिश्रम घेतले. या संगीत कार्यक्रमाला नूतन शिक्षण संस्थेचे सहसचिव जयप्रकाश बिहाणी, नंदकिशोर बाहेती, डॉ.रामराव रोडगे, लक्ष्मीकांत सुभेदार, किशोर जोशी, प्रा. देशमुख, डॉ. प्रविण जोग, शशिकांत डीग्रसकर, शिवनारायण मालाणी, उमेश खारकर, रमा बाहेती, हेमलता देशमुख, अनघा पांडे, रघुनाथ देशमुख, के.के.देशपांडे, डी.डी.सोन्नेकर, प्रदीप कौसडीकर, पूजा तोडकर, कीर्ती राऊत, शिरीष संघई, डॉ.गंगाधर गळगे, नारायण इक्कर, एन.एम.देशपांडे यांच्यासह संगीत क्षेत्रातील रसीक श्रोते मोठ्या संख्येने उपस्थित होते.