थेट बांधावर : अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे यांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद

थेट बांधावर : अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे यांनी साधला शेतकऱ्यांशी संवाद

अतिवृष्टीमुळे बाधित दुधना नदीकाठच्या गावांना भेटी, नुकसानग्रस्त भागाची केली प्रत्यक्ष पाहणी

परभणी : शनिवारी व रविवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे बाधित परभणी तालुक्यातील मौजे पिंपळगाव सय्यदमिया, काष्टगावसह दुधना नदीकाठच्या अनेक गावांना परभणीचे अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे यांनी मंगळवारी सकाळपासून भेटी दिल्या. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानग्रस्त भागाची प्रत्यक्ष पाहणी केली. परभणी जिल्ह्यामध्ये मागील दोन दिवसापासून झालेल्या संततधार पावसामुळे जिल्ह्यामध्ये अनेक भागांमध्ये पूरग्रस्त परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच पिकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यामुळे पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. या सर्व बाबींचा आढावा घेण्यासाठी अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे यांनी मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासूनच परभणी तालुक्यातील अनेक गावांना भेटी दिल्या आणि शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन प्रत्यक्ष पाहणी करून संवाद साधला. तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार यांना देण्यात आले आहेत. नागरिकांनी देखील पुराच्या पाण्यामध्ये प्रवास करू नये, आवश्यक त्या मदतीसाठी तत्काळ जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा, असे आवाहन केले. दरम्यान, दुधना नदीवरील पुलावर सकाळी नऊ वाजेपर्यंत सात ते आठ फूट पाणी होते. पुलाच्या सुरक्षितेची पाहणी करून त्याचा आढावाही डॉ.काळे यांनी घेतला.‌ यावेळी परभणीचे तहसीलदार संदीप राजपुरे, संबंधित गावातील मंडळ अधिकारी, तलाठी ग्रामसेवक, कृषी सहायक यांची उपस्थिती होती.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!