एसटी कामगारांच्या संपाला परभणीमध्ये प्रतिसाद
ठिकठिकाणच्या बसआगारात धरणे आंदोलन
परभणी : राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचार्यांना सातव्या वेतन आयोगाप्रमाणे तसेच शासकीय कर्मचार्यांप्रमाणे सेवेत नियमित करीत वेतन व भत्ते द्यावेत या प्रमुख मागणीसाठी कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपाला परभणीत संमिश्र प्रतिसाद मिळाला. दरम्यान, महामंडळाच्या परभणी विभागात ८० टक्के बससेवा नियमित सुरु होती. असा दावा राज्य परिवहन महामंडळाचे विभागीय नियंत्रक सचिन डफळे यांनी केला आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी विविध संघटनांनी मंगळवारी राज्यव्यापी संप पुकारला. कर्मचारी संघटनांनी सातव्या वेतन आयोगा प्रमाणे एसटीच्या कर्मचार्यांनाही वेतन द्यावे, शासकीय कर्मचार्यांप्रमाणे सेवेत नियमित करावे, त्याप्रमाणे वेतन व भत्ते द्यावेत, यासह अन्य काही मागण्या केल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत ७ ऑगस्ट रोजी बैठक झाली. त्यातून बहुतांशी मागण्या मान्य झाल्या. परंतु, त्या संदर्भात पुढे सरकारने कोणतेही अध्यादेश काढले नाहीत, अशी तीव्र खंत व्यक्त करीत या कर्मचार्यांनी मंगळवारी संप पुकारला. त्यात महामंडळांतर्गत बहुतांशी कर्मचारी संघटना सहभागी झाल्या होत्या. दरम्यान, परभणी जिल्ह्यात या संपाचा २० टक्केच परिणाम जाणवला. एसटीच्या जवळपास ३ हजार फेर्या होतात. त्यापैकी चौदाशे फेर्या मंगळवारी सायंकाळपर्यंत झाल्या. सोळाशे फेर्या रद्द कराव्या लागल्या. परंतु, परिवहन महामंडळाच्या सुमारे १५० बसेस कराराप्रमाणे राष्ट्रपतींच्या कार्यक्रमाकरीता लातूर विभागात गेल्यामुळे त्या बसेसच्या मंगळवारी फेर्या झाल्या नाहीत, असे विभागीय नियंत्रक कार्यालयाने म्हटले. दरम्यान, पाथरी आगारात धरणे आंदोलन करण्यात आले. आंदोलनामध्ये वसंत बोराडे, प्रताप शेळके, बळीराम तिडके, रमेश तायनाथ, प्रकाश सोळंके, उद्धव भुजबळ, स्वाती हरकळ, जाधव, धोंडीराम भिसे आदींसह कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.
एसटी कर्मचारी संघटनांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपाच्या पार्श्वभूमीवर परभणी जिल्ह्यात धरणे आंदोलनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. याचा वाहतुकीवर काही प्रमाणात परिणाम झाला. बुधवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रमुख मागण्यांवरील चर्चेसाठी संघटनांना वेळ दिला आहे. त्याद्वारे सकारात्मक तोडगा निघेल अशी एसटी कामगारांना आशा आहे. – वसंत बोराडे, राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेस