पत्रकार नारायण पाटील यांनी निष्ठावान पत्रकारितेचा आदर्श निर्माण केला
दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांचे प्रतिपादन : पत्रकार नारायण पाटील यांचा सेलूत भव्य नागरी सत्कार; सेलूकरांची मोठी उपस्थिती
सेलू जि.परभणी : पत्रकारिता क्षेत्रातील नवनवीन आव्हाने पेलत, सेलू येथील जेष्ठ पत्रकार नारायण पाटील यांनी ‘दैनिक सामना’ च्या माध्यमातून सेलू शहर आणि तालुक्याच्या विकासाच्या अनुषंगाने एक समाजाभिमुख, सकारात्मक आणि निष्ठावान पत्रकारितेचा वसा जपला आहे. याद्वारे एक आदर्श निर्माण केला आहे, असे प्रतिपादन जेष्ठ चित्रपट दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे यांनी केले.
जेष्ठ पत्रकार नारायण पाटील यांच्या पासष्टी आणि त्यांच्या अर्धांगिनी नलिनी यांच्या एकसष्ठी निमित्त नागरी सत्कार समितीच्या वतीने पाटील दाम्पत्यांचा भव्य नागरी सत्कार सोहळा गुरुवारी, पाच सप्टेंबर रोजी सेलू येथील साई नाट्यगृहात उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी जिंतूर-सेलू विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर होत्या. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जेष्ठ चित्रपट दिग्दर्शक पुरुषोत्तम बेर्डे, अनिता बेर्डे, स्वागताध्यक्ष माजी आमदार हरिभाऊ लहाने, माजी नगराध्यक्ष विनोद बोराडे, जिपचे माजी सभापती अशोक काकडे, श्रीराम प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे, नागरी सत्कार समितीचे अध्यक्ष प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी आदींची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी माजी आमदार लहाने, श्री.काकडे, श्री.बोराडे, डॉ.रोडगे यांनी नारायण पाटील यांच्या कार्याचा गौरव करीत पत्रकार म्हणून त्यांनी दिलेल्या सामाजिक क्षेत्रातील तसेच सेलू शहराच्या जडणघडणीतील योगदानाबद्दल प्रशंसा केली. जेष्ठ पत्रकार कांचन कोरडे, सतीश कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय भाषणात आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी पत्रकार नारायण पाटील दाम्पत्यांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा देत, पत्रकारांचे प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करणार असल्याची ग्वाही दिली. यावेळी पत्रकार संघासह सेलूतील विविध पक्ष, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक संस्था, संघटना तसेच सर्वच स्तरातील नागरिकांच्या वतीने पाटील दाम्पत्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. प्रास्ताविक प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी यांनी केले. प्रारंभी श्री केशवराज बाबासाहेब महाराज, दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर, माजी राष्ट्रपती डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमांचे पूजन झाले. श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयातील मुलींच्या लेझीम पथकाने लक्ष वेधले. सुरेश हिवाळे यांनी पाहुण्यांचा परिचय दिला. पत्रकार मल्हारीकांत देशमुख यांनी शब्दांकन केलेल्या सन्मानपत्राचे वाचन शिक्षक डॉ.शरद ठाकर यांनी केले. सूत्रसंचालन सुभाष मोहकरे, प्रा.संजय पिंपळगावकर यांनी केले. किरण चौधरी यांनी आभार मानले. कार्यक्रमाला सेलू शहर व परिसरातील विविध स्तरांतील नागरिक, महिला, स्नेहीजण मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नागरी सत्कार समिती सदस्य तसेच नरेश, निशिकांत, निलेश व नयना पाटील यांच्यासह पाटील परिवार आणि स्नेहीजणांनी पुढाकार घेतला.