आनंदाच्या शिधाविनाच गौरीगणपतीचा सण
आनंदाचा शिधा : रवा, तेल आले; चणाडाळ, साखरेची प्रतीक्षाच
परभणी / सेलू : शिधापत्रिका धारकांचा सण गोड व्हावा, या उद्देशाने दोन वर्षापासून राज्य सरकारकडून सणासुदीला शंभर रुपयांत चार वस्तू असलेला ‘आनंदाचा शिधा’ वितरित केला जातो. मात्र, संबंधित विभागाकडून साखर व चणाडाळचा पुरवठा करण्यात न आल्याने, आनंदाच्या शिधाविनाच गरजूंना गौरीगणपतीचा सण साजरा करावा लागत आहे.
वर्षभरात विविध सण, उत्सव साजरे केले जातात. या सणाचा आनंद द्विगणित करता यावा. यासाठी अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब योजना आणि एपीएल शिधापत्रिकाधारकांना चार वस्तूंचा ‘आनंदाचा शिधा’ शंभर रुपयांत वितरित केला जातो. गौरी, गणपती सणाला स्वस्त धान्य दुकानातून एक किलो साखर, एक किलो चणाडाळ, एक किलो तेल व एक किलो रवा अशा चार वस्तू असलेला आनंदाचा शिधा वितरित केल्या जाणार आहे. महालक्ष्मीच्या सणापूर्वीच आनंदाचा शिधा वितरित केला जाईल. अशी अपेक्षा शिधापत्रिका धारकांना होती. पंरतू, चार वस्तू पैकी केवळ तेल आणि रवा या दोनच वस्तू पुरवठा विभागाला प्राप्त झाल्या आहेत. साखर व आणि चणाडाळ अद्यापही मिळालेली नाही. परिणामी महालक्ष्मीचा सण आनंदाच्या शिध्या विनाच शिधापत्रिका धारकांना साजरा करावा लागत आहे. तालुक्यात १२१ स्वस्त धान्य दुकान आहेत. शहरात २१ दुकाने आहेत. अंतोदय अन्न योजनेचे ५५६६, प्राधान्य कुटुंब योजनेचे २१८२२ तर एपीएल योजनेअंतर्गत ४९७५ असे एकूण ३२ हजार ३६३ शिधापत्रिका धारक आहेत. त्यांना सणासुदीला शंभर रुपयांमध्ये चार वस्तू असलेला आनंदाचा शिधा वितरित केला जातो. गौरी, गणपती सणासाठी देखील साखर, चणाडाळ, तेल आणि रवा या चार वस्तूचा शंभर रुपयांमध्ये आनंदाचा शिधा वितरित केल्या जाणार आहे. माञ, साखर आणि चणाडाळ पुरवठा विभागाला वाटप करण्यासाठी प्राप्त झाली नाही. त्यामुळे महालक्ष्मीच्या सणानंतरच शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा मिळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान, प्राप्त माहितीनुसार मागणीच्या ८५ टक्केच नियतन पुरवठा विभागाला प्राप्त झाले आहे. त्यातही साखर व चणाडाळ आलेली नाही.
२७६७१ लाभार्थीसाठी नियतन प्राप्त :अंत्योदय अन्न योजना, प्राधान्य कुटुंब योजना आणि एपीएल योजनेतील एकूण ३२३६३ शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा वितरित करण्यासाठी नियतनाची गरज आहे. मात्र, प्रत्यक्षात अंत्योदयचे ४७५९ , प्राधान्य कुटुंब योजनेचे १८६५८, एपीएल योजनेचे ४२५४ असे एकूण २७६७१ एवढेच नियतन पुरवठा विभागाला प्राप्त झाले आहे. त्यामुळे उर्वरित साहित्याचा पुरवठा होईपर्यंत आनंदाचा शिधावाटप रखडले आहे.
गौरी गणपती सणाला आनंदाचा शिधा वितरित करण्यासाठी साखर आणि चणाडाळ प्राप्त झाले नाही. उर्वरित साहित्य प्राप्त होताच स्वस्त धान्य दुकानातून आनंदाचा शिधा वितरित केला जाईल. – गजानन इनामदार, नायब तहसीलदार, पुरवठा विभाग, सेलू