घरोघरी गौरीपूजन उत्साहात, आज विसर्जन
सायंकाळपर्यंत चालणार हळदी-कुंकवाची लगबग
सेलू : बुधवारी ज्येष्ठा नक्षत्राच्या मुहूर्तावर गौरींचे पूजन मोठ्या भक्तीभावाने घरोघरी करण्यात आले. या पूजनामुळे वातावरण मंगलमय झाले होते. आज, गुरुवारी गौरींनी निरोप देण्याची घटिका आहे. सायंकाळपर्यंत चालणाऱ्या हळदी-कुंकवाच्या कार्यक्रमानंतर गौरींना सद्गदित अंतःकरणाने निरोप दिला जातो.
ज्येष्ठा आणि कनिष्ठा गौरींचे आगमन मंगळवारी अनुराधा नक्षत्राच्या मुहूर्तावर झाले. त्यामुळे घरोघरी चैतन्य निर्माण झाले होते. बुधवारी ज्येष्ठा नक्षत्राच्या मुहूर्तावर गौरींचे पूजन करण्यात आले. घरोघरी पारंपरिक पद्धतीने गौरींचे पूजन झाले. प्राणप्रतिष्ठापना करून पूजनाला सुरुवात करण्यात आली. सोळा वेळा श्रीसूक्ताचे आवर्तन करून पूजा करण्यात आली. त्यानंतर महानैवेद्य, आरती आणि सुवासिनींचे भोजन हे कार्यक्रम पार पडले. हे सर्व कार्यक्रम घरोघरी मोठ्या भक्तिभावाने करण्यात आले. पूजनात कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत याची खबरदारी घरोघरी घेतली जात होती. गुरुवारी मूळ नक्षत्रावर गौरींना निरोप दिला जाणार आहे. त्यासाठी सकाळी दहीभाताचा किंवा परंपरेने चालत आल्यानुसार तयार केलेल्या अन्नाचा नैवेद्य गौरींना दाखवला जातो, त्यानंतर आरती करून निरोप दिला जातो. सायंकाळी हळदीकुंकवाचा कार्यक्रम होऊन गौरींचे विसर्जन केले जाते.