गौराईसमोरील देखाव्याने वेधले लक्ष
रामपूरकर कुटुंबियांची देखाव्यांची २७ वर्षांची परंपरा
सेलू : सेलू (जि.परभणी) येथील अरुण रामपूरकर कुटुंबियांनी गौराईसमोर अध्यात्मिक तसेच ज्वलंत विषयावर समाज प्रबोधनपर देखावा सादर करण्याची २७ वर्षांची परंपरा यावर्षीही जपली आहे. यावर्षी त्यांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या जीवन कार्यावर मांडलेला देखावा पाहण्यासाठी महिलांची झुंबड उडाली आहे. देखाव्यामध्ये पर्यावरण रक्षण, भूतदया, समाजातील अनिष्ट रूढींवर संत तुकाराम महाराज यांनी आपल्या अभंगाद्वारे केलेले समाज प्रबोधन, छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज यांची भेट, संत तुकाराम महाराज यांचे शिष्य संताजी जगनाडे महाराज तसेच पालखी सोहळ्यातील रिंगण, संत तुकाराम महाराज यांचे वैकुंठगमन आदी प्रसंग स्वयंचलित पद्धतीने साकारण्यात आले आहेत. देखाव्यासाठी दोन महिन्यांपासून तयारी केली जाते. पत्नी बेबीताई मुले गोविंद व गोपाल तसेच दीपक देवा आदींसह मित्रांचे सहकार्य लाभले, असे अरूण रामपूरकर यांनी सांगितले.