गावोगावी गणेशोत्सवाचा उत्साह; सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर भर 

गावोगावी गणेशोत्सवाचा उत्साह; सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर भर 

गावोगावी गणेशोत्सवाचा उत्साह; सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रमांवर भर 

 

सेलू/परभणी : परभणी शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात गणेशोत्सवाचा उत्साह दिसून येत आहे. सार्वजनिक गणेश मंडळासह ठिकठिकाणच्या प्राचीन गणेश मंदिराचा परिसर विद्युत रोषणाईने झगमगून गेला आहे.आकर्षक देखावे, विविध स्पर्धा उपक्रम,अन्नदान महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.

सेलू शहरातील गणपती गल्लीत प्राचीन श्री सिद्धिविनायक मंदिर आहे. पूर्वी मेंढ्या गणपती म्हणून हा गणपती ओळखला जायचा. नव्वदच्या दशकात नागरिक व व्यापाऱ्यांच्या पुढाकाराने जिर्णोद्धार झाला. शाडूच्या मातीतील शेंदूर विलेपित पूर्वाभिमुख मूर्ती लक्षवेधी आहे. महिन्याच्या गणेश चतुर्थीसह गणेशोत्सव काळात मंदिर संस्थानच्या वतीने विविध धार्मिक, पारंपरिक उत्सव साजरे केले जातात. भंडारा महाप्रसादाचे आयोजन केले जाते. नवसाला पावणारा गणपती म्हणून श्री सिद्धिविनायकावर भाविकांची श्रद्धा आहे, असे पुजारी संजय कुलकर्णी यांनी सांगितले.

गणेशपूरचा श्रीसिद्धीविनायक

जिंतूर-जालना महामार्गांवर सेलूपासून २५ किलोमीटरवर गणेशपूर येथे प्राचीन श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर आहे. संकट काळात हाकेला धावून येणारा गणपती म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे. मंदिरात श्री हनुमंताचीही मूर्ती आहे. दोन्ही मूर्ती पावणे चारशे वर्षांपासून आहेत, असे सांगितले जाते. विशेष म्हणजे गणेशपूर गाव अस्तित्वात नाही. मात्र, सरकार दरबारी ‘निर्जन गणेशपूर ‘ नोंद आढळते. दर गणेश चतुर्थीला सेलू , मंठा, जिंतूर व पंचक्रोशीतील भाविक श्रद्धेने पायी वारी करतात. गणेश चतुर्थी व गणेशोत्सवात भाविकांची गर्दी असते. विविध कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन केले जाते.

श्री सिद्धिविनायक, डुघरा

डुघरा (ता.सेलू) येथील सिद्धिविनायक गणपती मंदिर पेशवेकालीन असून,  गणेश जयंती उत्सवाला अडीचशे वर्षांची परंपरा आहे. यानिमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रम, महाप्रसादाचे आयोजन केले जाते. पंचक्रोशीतील भाविक श्रद्धेने दर्शनासाठी गर्दी करतात. मूर्ती विलोभनीय आहे. तीस वर्षांपूर्वी मंदिराचा जीर्णोद्धार करण्यात आला आहे, ग्रामस्थांच्या वतीने विविध कार्यक्रम उत्साहात साजरे केले जातात, असे किरण डुघरेकर यांनी सांगितले.

कुंडीचा श्री सिद्धिलक्ष्मी गणेश

सेलूपासून जवळच पाथरी रस्त्यावर कुंडी शिवारात श्री सिद्धिलक्ष्मी गणेश मंदिर आहे. गणेशराव बळीराम मोगल यांना पाथरी येथील गणेश भक्ताने मंदिर स्थापनेसाठी मूर्ती दिली होती. मंदिरासाठी मोगल यांनी काही जागा दिली. परंतू बराच काळ मूर्ती ओट्यावरच होती. पंधरा वर्षापूर्वी गणेशराव,अण्णासाहेब यांनी मंदिर बांधण्याचे ठरविले. दुष्काळात शेतीतील विहीरीचे पाणी टॅंकरने विकून आलेल्या रक्कमेतून मोगल कुटुंबियांनी मंदिर उभारले. पंचक्रोशीतील भाविक श्रद्धेने पायी वारी करून दर्शनासाठी येतात. श्री गणेश जयंती व गणेशोत्सवात विविध कार्यक्रम, प्रसादाचे आयोजन केले जाते, असे भाऊसाहेब मोगल यांनी सांगितले.

वालूरचा श्री वरद विनायक 

सेलू तालुक्यातील वालूर येथील सिद्धराम बादशहा मठ संस्थान परिसरात श्री सिद्धीविनायकाचे प्राचीन मंदिर आहे, तर ब्राम्हणगल्लीतील धर्मशाळेत वरद विनायकाची स्वयंभू मूर्ती आहे. उत्सवाला दोनशे वर्षाची पंरपरा आहे. यानिमित्त पारंपरिक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. पूर्वी एकवीस दिवसाचा गणेशोत्सव  मंदिरात साजरा केला जात होता. आता हे मंदिर जीर्ण अवस्थेत आहे. मात्र दैनंदिन कार्यक्रमांसह वार्षिक उत्सव उत्साहात साजरे केले जातात, असे शंतनू महाराज पाठक यांनी सांगितले.


अकरा गावात ‘एक गाव एक गणपती’ : सेलू तालुक्यात १०९ सार्वजनिक गणेश मंडळांनी रीतसर परवानगी काढून गणेश मंडळांची स्थापना केली आहे. शहरात १९ तर ग्रामीण भागात ९० गणेश मंडळांनी स्थापना केली आहे.  करडगाव, कुंभारी, घोडके पिंप्री, नागठाणा, सोनवटी, ब्राह्मणगाव प्र.प्र., गोमेवाकडी, पिंप्रुळा, चिकलठाणा (खुर्द) रायपूर व बोरगाव जहागीर या अकरा गावांत ‘एक गाव एक गणपती’ संकल्पनेला प्रतिसाद मिळाला. ठिकठिकाणी पोलीस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


 

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!