महिला पोलिस पाटलास मारहाण; दोघांविरुद्ध सेलूत गुन्हा दाखल
सेलू/परभणी : हादगाव पावडे (ता.सेलू) येथील महिला पोलिस पाटील मंगल भागवत पावडे यांना बुधवारी (१८ सप्टेंबर) सकाळी दोघांनी मारहाण केली. याबाबत तक्रारीवरून पोलिसांत दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. हादगाव पावडे येथील महिला पोलिस पाटील बुधवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास शासकीय कामात असताना मंगळवारी ‘माझ्या घरांसमोर साउंड सिस्टिम चालू असल्याची व बरेचजण नाचत असल्याची व आरडाओरडा करत असल्याची माहिती पोलिसांना का दिली, माझे घर पोलिसांना का दाखविले, तू कोण लागून गेली पोलिस पाटील’, असे म्हणून शिवीगाळ करीत त्यांना थापडबुक्यांनी मारहाण करण्यात आली. यावरून गावातील गणेश रावसाहेब काळे व राधा गणेश काळे यांच्याविरुद्ध सरकारीकामात अडथळा आणला. म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस निरीक्षक दीपक बोरसे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख तपास करीत आहेत.
..