‘त्या’ शिक्षकांचा उपोषणाचा इशारा : पटपडताळणीसह कारभाराची चौकशीची मागणी
परभणी : सेलू शहरातील श्रीरामनगर भागातील विद्यानिकेतन प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांची पटपडताळणी (डोके मोजणी) करण्यात यावी; अन्यथा २६ सप्टेंबरपासून बेमुदत उपोषणाचा इशारा याच शाळेतील चार शिक्षकांनी दिला आहे. या संदर्भात परभणी येथील शिक्षणाधिकारी (प्राथमिक) कार्यालयात सोमवारी, २३ सप्टेंबर रोजी निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की; सेलू शहरातील श्रीराम नगर भागातील विद्यानिकेतन प्राथमिक शाळेत जून २०२४ पासून विद्यार्थी अनुपस्थित असतात. सरल प्रणालीमध्ये ऑनलाईन विद्यार्थी नोंदणी ५३ असून, संबंधित सर्व विद्यार्थी हे इतरत्र शिक्षण घेत आहेत. फक्त या विद्यार्थ्यांची नावे या शाळेत आहेत. हे विद्यार्थी कधीही शाळेत येत नाहीत. विद्यार्थ्यांची उपस्थिती दाखविण्यासाठी शाळा प्रशासन दबाव टाकत आहे. ३० सप्टेंबर २०२४ ही तारीख संच मान्यतेसाठी ग्राह्य धरल्याने, शाळा प्रशासनाने ३० सप्टेंबर या तारखेच्या हिशोबाने सप्टेंबर महिन्यामध्ये इतर तालुका व जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमांच्या शाळेकडून हे विद्यार्थी ऑनलाईन विकत घेतलेले आहेत. तसेच पुन्हा विद्यार्थी ऑनलाईन विकत घेण्याची तयारी सुरु आहे. वास्तविक हे विद्यार्थी कधीही शाळेत येत नाहीत. शिक्षकांची पदे वाचवणे व सरकारच्या इतर योजनांचा लाभ घेण्यासाठी शाळा प्रशासन हे सर्व करत आहे. शाळेतील कोणत्याही शिक्षकाला ही गोष्ट मान्य नाही, तरीसुध्दा प्रशासनाच्या दबावापोटी शिक्षक हजेरी पटावर उपस्थिती दाखवत आहेत. शाळेमध्ये एकूण शिक्षक संख्या ९ आहे, तर शाळेत उपस्थित विद्यार्थी फक्त ७-८ आहेत. आणि ऑनलाईन विद्यार्थी संख्या ही ५३ आहे. या सर्व कारभाराची चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी; अन्यथा मुप्टा शिक्षक संघटनेतर्फे २६ सप्टेंबरपासून बेमुदत उपोषण करण्यात येईल, असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर शिक्षक शिवशंकर भाग्यवंत, विजय टेकाळे, अनिल कदम, गजानन ढाकरे यांच्या सह्या आहेत.