‘निम्नदुधना’च्या दोन दरवाजातून विसर्ग
परभणी : जिल्ह्यात गेल्या दोन तीन दिवसांपासून पावसाने चांगली हजेरी लावली आहे. बुधवारीही जिल्ह्यातील विविध भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. दरम्यान, पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे सेलू (जि.परभणी) तालुक्यातील ब्रह्मवाकडी येथील निम्नदुधना धरणाचे दोन दरवाजे बुधवारी, २५ सप्टेंबर रोजी दुपारी बारा वाजता ०.१५ मीटरने उघडून १०१६ क्युसेक दराने विसर्ग दुधना नदीपात्रात करण्यात येत आहे. धरणाची जलाशय पाणीपातळी ४२५.२१० मीटरवर पोहोचली आहे. सद्यस्थितीत धरणात जीवंत पाणीसाठा १८१.७८० दलघमी (७५.०५ टक्के) आहे. धरणात पाण्याची होणारी आवक पाहता विसर्ग कमी अथवा जास्त करण्याची कार्यवाही करण्यात येईल. नदीकाठच्या गावांनी सावध राहावे, असे निम्न दुधना प्रकल्प, पूर नियंत्रण कक्षाने कळविले आहे. दरम्यान, बुधवारी सकाळपर्यंत परभणी जिल्ह्यात सरासरी १७.३ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. परभणी, गंगाखेड, मानवत तालुक्यात चांगला पाऊस झाला.