एलिमेंटरी, इंटरमीजिएट परीक्षा सुरू; राज्यात साडेसात लाख विद्यार्थी
सेलू येथील नूतन विद्यालय केंद्रावर २३३ विद्यार्थी
एलिमेंटरी, इंटरमीजिएट अशा दोन्ही परिक्षेसाठी या वर्षी सात लाख ५० हजार ९३५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याचे सूत्रांनी सांगितले. परीक्षा उत्तीर्ण विद्यार्थ्यांना दहावी शिक्षक मंडळाच्या परीक्षेच्या गुणपत्रिकेत श्रेणीनुसार सवलतीचे गुण दिले जातात.
परभणी : कला संचालनालयातर्फे बुधवारपासून (२५ सप्टेंबर) शासकीय रेखाकला एलिमेंटरी, इंटरमीजिएट ग्रेड परीक्षेला सुरुवात झाली. परीक्षेस बुधवारी एलिमेंटरी परीक्षेचे वस्तुचित्र व स्मरणचित्र असे दोन पेपर घेण्यात आले. सेलू येथील नूतन विद्यालय केंद्रावर एलिमेंटरी परीक्षेसाठी १६८, तर इंटरमीजिएट परीक्षेसाठी ५४ विद्यार्थी आहेत. केंद्रप्रमुख म्हणून मुख्याध्यपक संतोष पाटील, तर सहकेंद्रप्रमुख म्हणून कलाशिक्षक आर.डी.कटारे, सहाय्यक फुलसिंग गावीत काम पाहात आहेत.
परीक्षेसाठी पर्यवेक्षक म्हणून एम.जे.वाघमारे, एन.व्ही चव्हाण, जी.आर.मुळी, बी.एम.गोरे, एस.ए. शेरे, आर.बी.रोकडे एस.ए.सूर्यवंशी, पांडुरंग पाटणकर, कुंभार काम पाहात आहेत. केंद्रप्रमुख संतोष पाटील, उपमुख्याध्यापक किरण देशपांडे यांनी परीक्षेला भेट देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवला. कला संचालनालयातर्फे शासकीय रेखाकला परीक्षा २५ ते २८ सप्टेंबर दरम्यान होत आहेत. या परीक्षेसाठी विविध राज्यांतील सुमारे साडेसात लाख परीक्षार्थीनी नोंदणी केली आहे. कला संचालनालयातर्फे २५ आणि २६ सप्टेंबर असे दोन दिवस एलिमेंटरी; तर २७ व २८ सप्टेंबर असे दोन दिवस इंटरमीजिएट परीक्षा घेण्यात येणार आहे. बुधवारी १०:३० वाजता वस्तुचित्र आणि दुपारच्या सत्रात दोन वाजता स्मरणचित्र असे दोन पेपर घेण्यात आले. गुरुवारी सकाळच्या सत्रात संकल्पचित्र-नक्षीकाम आणि दुपारच्या सत्रात कर्तव्यभूमिती व अक्षरलेखन पेपर होणार आहेत. त्यानंतर २७ व २८ सप्टेंबर रोजी इंटरमिजिएट परीक्षेला सुरुवात होणार आहे. यात शुक्रवारी, २७ सप्टेंबर रोजी इंटरमीजिएटचे दोन पेपर होतील. सकाळी १०:३० वाजता स्थिरचित्र आणि दुपारी अडीच वाजता स्मरणचित्र असा पेपर होणार आहे. २८ सप्टेंबर रोजी सकाळच्या सत्रात संकल्पचित्र-नक्षीकाम आणि दुपारच्या सत्रात कर्तव्य भूमिती, घनभूमिती व अक्षरलेखन हे पेपर होणार आहेत., अशी माहिती कला संचालनालय परीक्षा समितीचे सदस्य, कला शिक्षक चंद्रकांत लिंबेकर यांनी दिली.