निवडणुकविषयक कामे दक्षतेने करावीत : जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांचे आदेश
परभणी : आगामी विधानसभा निवडणूक यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दिलेली जबाबदारी समन्वय व दक्षतेने पार पाडावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांनी दिले.
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी संपूर्ण निवडणूक प्रक्रियेचे प्रशिक्षण देण्याची सूचना मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून करण्यात आली. त्यानुसार जिल्हा निवडणूक अधिकारी रघुनाथ गावडे यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात
आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून प्रभावीपणे पूर्वतयारी सुरू आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बुधवारी व गुरूवारी विविध बाबींचे प्रशिक्षण सत्र जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आले होते. यावेळी श्री.गावडे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी पोलीस अधीक्षक रविंद्रसिंह परदेशी, मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथूर, अपर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अजिंक्य पवार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्धन विधाते यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलीस अधिकारी आणि सर्व नोडल अधिकारी उपस्थित होते. दोन दिवसीय प्रशिक्षण सत्रामध्ये निवडणुकीच्या प्रत्येक टप्प्याशी संबंधित प्रत्येक बाबींचे प्रशिक्षण अधिकारी व कर्मचार्यांना देण्यात आले. जिल्हाधिकारी श्री.गावडे म्हणाले की, निवडणूक कामकाजात कुठलीही चूक करु नये. निवडणुकशी संबंधित सर्व माहिती जाणून घ्यावी. प्रत्यक्ष निवडणूक जाहीर झाल्यानंतर काय करावे, याबाबत दक्ष राहावे. स्वीप कार्यक्रमातंर्गत मतदानाविषयी जनजागृती करावी.