सोमेश्वर गिराम कृषी भूषण पुरस्काराने सन्मानित
सेलू : सेलू तालुक्यातील रवळगाव येथील शेतकरी सोमेश्वर गिराम आणि पत्नी राधिका यांना महाराष्ट्र सरकारच्या सेंद्रिय शेतीमधील कृषी भूषण पुरस्काराने मुंबई येथे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या हस्ते रविवारी, २९ सप्टेंबर रोजी एका विशेष समारंभात सन्मानित करण्यात आले. सन्मानपत्र, दोन लाख रुपये, शाल, पैठणी, गणेशाची मूर्ती, १० ग्राम चांदीचे पदक आणि ओळखपत्र, असे कृषीभूषण पुरस्काराचे स्वरूप आहे. या वेळी त्यांच्या समवेत परमेश्वर राऊत उपस्थित होते. पुरस्काराने सन्मानित करण्यात आल्यानंतर सोमेश्वर गिराम यांनी समाधान व्यक्त केले. पुरस्काराबद्दल गिराम दाम्पत्याचे कृषी तसेच सामाजिक क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.