विद्यार्थीनींशी अश्लील भाषेत संवाद; शिक्षकाविरूद्ध मानवतमध्ये गुन्हा दाखल

विद्यार्थीनींशी अश्लील भाषेत संवाद; शिक्षकाविरूद्ध मानवतमध्ये गुन्हा दाखल

छडीने मारहाणीचीही तक्रार; शाळेच्या तक्रार पेटीतील चिठ्ठयातून उघडकीस आला प्रकार 

परभणी : वर्गात विद्यार्थीनींशी अश्लील भाषेत संवाद साधून विनाकारण छडीने मारहाण केल्याची घटना मानवत येथील जिल्हा परिषद प्रशालेत घडली. विद्यार्थीनीनी तक्रारपेटीत टाकलेल्या चिठ्ठीतून हा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी दिलेल्या तक्रारीवरून मानवत पोलिस ठाण्यामध्ये संबंधित शिक्षकाविरुद्ध बुधवारी ( दोन ऑक्टोबर) गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

तक्रारीत म्हटले आहे की, शाळेमध्ये एक तक्रार पेटी बसविण्यात आली आहे. एक ऑक्टोबर रोजी मानवत पोलीस ठाणे निर्भया पथकामधील पोलीस अमंलदार शकुंतला चांदीवाले व सय्यद फैय्याज यांनी भेट दिली असता, इयत्ता ८ वीच्या विद्यार्थीनींनी आमची तक्रार असल्याचे सांगत तक्रार पेटीमध्ये तक्रार लिहून टाकल्याचे पथकाला सांगितले. शाळेतील शिक्षिका, शिपाई तसेच पोलीसासमक्ष तक्रार पेटी उघडली असता, त्यामध्ये काही विद्यार्थ्यांनी तक्रारी लिहून टाकल्यांचे दिसून आले. त्यातील तक्रारीत शाळेतील शिक्षक दत्ता होगे हे विद्यार्थी व विद्यार्थीनीना विनाकारण छडीने हातावर मारुन अश्लिल भाषेत वाईट बोलत असल्याचे निदर्शनास आले. तक्रार पेटीतील चिठ्ठयाबाबत वर्गात जाऊन चौकशी केली असता संबंधित शिक्षक अश्लिल भाषेत बोलतात व छडीने मारतात असे पथकाला आढळून आले. यावरून शिक्षक दत्ता गंगाधर होगे याच्या विरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियमासह अन्य एका कलमाखाली मानवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहायक पोलिस निरीक्षक संदीप बोरकर तपास करीत आहेत.

निर्भया पथकाच्या भेटीमुळे उघड झाली घटना : पोलिस प्रशासनाच्या वतीने महिला अत्याचाराविरुद्ध कार्यवाही करण्यासाठी मानवत पोलिस ठाण्याअंतर्गत निर्भया पथकाची स्थापना करण्यात आली असून यामध्ये महिला पोलिस अंमलदाराची नियुक्ती केली आहे. हे पथक शाळा व महाविद्यालयांना भेटी देत असून विद्यार्थ्यांशी संवाद साधत असते. मानवत जिल्हा परिषद प्रशालेतील हा प्रकार निर्भया पथकाच्या भेटीमुळे उघडकीस आला आहे.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!