विद्यार्थ्यांनो, संगणकाशी खेळा; दोस्ती करा
आमदार मेघना बोर्डीकर यांचे प्रतिपादन; ‘दीपस्तंभ’तर्फे नूतन विद्यालयास १० संगणक भेट
आमदार मेघना बोर्डीकर म्हणाल्या की, कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानाच्या मदतीने संगणक यंत्रणा मानवी बुद्धिमत्तेसारख्या प्रक्रिया करू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संगणकाशी खेळावे आणि आपल्या प्रज्ञेद्वारे जागतिक पातळीवर कीर्ती संपादन करून शाळेचा लौकिक वाढवावा.
सेलू /परभणी : सध्याचे युग, संगणकाचे युग म्हणून ओळखले जाते. संगणक आणि डिजीटल क्रांतीने आजच्या समाज जीवनावर सर्वांगीण परिणाम केलेला आहे. त्यामुळे प्रगती साधण्यासाठी विद्यार्थ्यांनी संगणक साक्षर होऊन संगणकाशी दोस्ती करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले.
सेलू येथील नूतन विद्यालयास दीपस्तंभ प्रतिष्ठानच्या वतीने आमदार बोर्डीकर यांच्या हस्ते गुरुवारी, तीन ऑक्टोबर रोजी १० संगणक प्रदान करण्यात आले. त्या वेळी आमदार बोर्डीकर बोलत होत्या. अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ. एस.एम.लोया होते. चिटणीस प्राचार्य डॉ.व्ही.के.कोठेकर, सहचिटणीस जयप्रकाशजी बिहाणी, दत्तराव पावडे, अजिजखाँ पठाण, प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष ॲड.दत्ता कदम, रवी डासाळकर, कपिल फुलारी, ॲड.कृष्णा शेरे, कृष्णा गायकवाड आदींची प्रमुख उपस्थिती होती. आमदार बोर्डीकर म्हणाल्या की, कृत्रिम प्रज्ञा तंत्रज्ञानाच्या मदतीने संगणक यंत्रणा मानवी बुद्धिमत्तेसारख्या प्रक्रिया करू शकतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी संगणकाशी खेळावे आणि आपल्या प्रज्ञेद्वारे जागतिक पातळीवर कीर्ती संपादन करून शाळेचा लौकिक वाढवावा. यावेळी प्राचार्य डॉ.कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. डॉ.लोया यांनी अध्यक्षीय भाषणात संगणक भेटीमुळे विद्यार्थी आनंदीत झाल्याचे नमूद केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक संतोष पाटील पाटील यांनी केले. सूत्रसंचालन बाळू बुधवंत यांनी केले. उपमुख्याध्यापक के.के.देशपांडे यांनी आभार मानले.
छान!