‘त्या’ शिक्षकावर निलंबनाची कारवाई
परभणी : वर्गात विद्यार्थीनींशी अश्लील भाषेत संवाद साधून विनाकारण छडीने मारल्याप्रकरणी मानवत येथील जिल्हा परिषद प्रशालेतील शिक्षक दत्ता गंगाधर होगे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नतिशा माथुर यांनी या कारवाईबाबतचा आदेश गुरूवारी, तीन ऑक्टोबर रोजी सर्वसंबंधितांना दिला आहे. विद्यार्थीनींनी तक्रारपेटीत टाकलेल्या चिठ्ठीतून हा प्रकार उघडकीस आल्यानंतर शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी दिलेल्या तक्रारीवरून बुधवारी बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियमासह (पोस्को) अन्य एका कलमाखाली होगे यांच्याविरूद्ध मानवत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या संदर्भातील अहवाल मुख्याध्यापिका यांनी वरिष्ठांना पाठविला होता. प्राप्त अहवालानुसार जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी नतिशा माथुर यांनी गुरूवारी होगे यांच्या निलंबनाच्या कारवाईबाबतचा आदेश काढला आहे. निलंबन कालावधीत होगे यांचे मुख्यालय पंचायत समिती पालम हे राहील, असे आदेशात नमूद आहे.