नवरात्रोत्सव : सेलूतील श्रीजगंदबादेवी, श्रीकालिकादेवी मंदिरात विविध कार्यक्रम
श्रीजयभवानी नवरात्र महोत्सव मंडळाच्या देवी दर्शनासाठी भाविकांची गर्दी
सेलू/परभणी : नवरात्र महोत्सावनिमित्त सेलू शहरासह तालुक्यातील विविध मंदिरात तसेच सार्वजिनिक नवरात्र महोत्सव मंडचळाच्या वतीने भजन, कीर्तन, प्रवचन, श्री देवी भागवत आदींसह विविध धार्मिक, पारंपरिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
सेलूतील अत्यंत पुरातन व साडेतीनशे वर्षांची परंपरा असलेल्या शेरे गल्लीतील श्री जगदंबा नवरात्र महोत्सवास मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. शेरे परिवारातर्फे देवीचे विधीवत पूजन व आरती करून उत्सवाला सुरुवात झाली. दररोज दुपारी १२ ते ४ यावेळेत भागवताचार्य नंदकुमार महाराज गोंदीकर देवी भागवतकथेचे निरूपण करीत आहेत. महाआरती, देवीचे जागरण गोंधळ, भारूड, भजन आदी दैनंदिन कार्यक्रमांना तसेच दर्शनासाठी भाविकांची गर्दी आहे. आठव्या माळीला रात्री देवीचा होम होणार आहे. पौर्णिमेला देवीची पारंपरिक छबिना मिरवणूक काढण्यात येणार आहे. आराधी व परडीवाल्यांनी मंदिर परिसर गजबजून गेला आहे. मंदिर परिसर दिव्यांची रोषणाईने उजळून गेला आहे.
गुलमोहर कॉलनीमधील पुरातन आदिमाया श्री तुळजाभवानी मातेच्या मंदिरात नवरात्र महोत्सवानिमित्त विविध पारंपरिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. विद्यानगर भागातील श्री कालिका देवी मंदिरात २७ व्या नवरात्र महोत्सवास सुरुवात झाली. संस्थानचे अध्यक्ष अशोक कासार आणि मंगल कासार यांच्या हस्ते विधीवत पूजा करण्यात आली. महाआरती, भजन, होमहवन, पोर्णिमेनिमित्त महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री कालिका महिला मंडळासह संस्थानचे पदाधिकारी, सदस्य आणि कासार समाज बांंधवांनी पुढाकार घेतला आहे. क्रांती चौकातील श्री महालक्ष्मी, श्री तुळजाभवानी देवी मंदिरासह ठिकठिकाणच्या मंदिरात विविध पारंपरिक उत्सव होत आहेत. संत गोविंदबाबा चौकातील श्री जयभवानी नवरात्र महोत्सवाने चाळीस वर्षांची परंपरा जपली आहे. कै.प्रकाशसिंह ठाकूर यांनी १९८४ मध्ये महोत्सवास सुरुवात केली होती. विविध कार्यक्रमांसह कोजागिरी पौर्णिमेस देवीचा छबिना काढून महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. ठाकूर कुटंबियांसह मठ गल्लीतील भाविक उत्सवासाठी पुढाकार घेत आहेत.