मतदार जनजागृती मोहिमेला सेलू तालुक्यात प्रतिसाद
सेलू/परभणी : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार विधानसभा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या होऊ घातलेल्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हाभरात सुरू असलेल्या मतदार जनजागृती मोहीमेला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी जनार्दन विधाते, अप्पर जिल्हाधिकारी डॉ.प्रताप काळे यांच्या मार्गदर्शनाखाली १० सप्टेंबरपासून या मोहिमेला सुरुवात झाली. उपविभागीय अधिकारी व तहसील कार्यालयात अभिरूप मतदान केंद्र स्थापन करण्यात आले आहे.
फिरते वाहन पथकाद्वारे व्हीव्हीपॅट व ईव्हीएम जनजागृती केली जात आहे. सेलू येथील केंद्रावर विविध स्तरातील मतदार हजेरी लावून माहिती जाणून घेत आहेत. सेलूभूषण जयप्रकाश बिहाणी, नंदकिशोर बाहेती, सुरेंद्र तोष्णीवाल, माजी जिप उपाध्यक्ष राजेंद्र लहाने आदींनी भेट देऊन माहिती घेतली. ९ आक्टोबरपर्यंत ही मोहीम चालणार आहे. सेलू शहरासह तालुक्यात तीन ऑक्टोबरपर्यंत पर्यंत ९५ पैकी ७१ गावात जनजागृती पथकामार्फत मोहीम राबविण्यात आली असून, या मोहिमेला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याची माहिती मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाकडून देण्यात आली. सेलू तालुक्यात मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी संगीता सानप, सहायक अधिकारी तथा तहसीलदार डॉ.शिवाजी मगर यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार (निवडणूक) विजय मोरे, कृष्णा देशमुख, शितल कच्छवे, नोडल अधिकारी डॉ.संतोष मलसटवाड, श्री.पिंपळे, मास्टर ट्रेनर नितीन खाकरे, सुभाष मोहकरे, अनिल कदम, अमोल हाळणे, योगेश ढवारे, श्री.कोतवाल, प्रशांत क्षीरसागर, दत्तात्रय देशमुख, कुणाल थोरात, रामेश्वर मगर, अमोल आमले, विजय टेकाळे, सुधाकर देशमाने, आसाराम राऊत, शरद मिरगे आदी परिश्रम घेत आहेत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता केव्हाही लागू शकते या पार्श्वभूमीवर स्थापन झालेल्या विविध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण बैठकाही सुरू असून मतदान प्रक्रिया शांततेत व सुरळीत पार पडावी, मतदानाच्या अधिकारापासून कोणीही वंचित राहू नये, यासाठी प्रशासन दक्ष असल्याचे निवडणूक विभागाकडून सांगण्यात आले.