विद्यार्थ्यांनी स्वतःला घडविण्यात वेळ खर्च करावा : डॉ.संजय रोडगे
अपूर्वा पॉलिटेक्नीकमध्ये नवीन विद्यार्थ्यांचा इंडक्शन प्रोग्राम संपन्न
सेलू : येथील श्रीराम प्रतिष्ठान संचालित अपूर्वा पॉलीटेक्निकमध्ये प्रथम व थेट द्वितीय वर्षातील प्रवेशित नवीन विद्यार्थ्यांचा इंडक्शन प्रोग्राम उत्साहात झाला. याप्रसंगी बोलताना संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ.संजय रोडगे म्हणाले की, इतर राष्ट्राच्या तुलनेमध्ये व्यावसायिक अभ्यासक्रम घेणाऱ्यांची संख्या भारतामध्ये खूपच कमी आहे. जर आपण दक्षिण कोरिया, अमेरिका,जर्मनी या राष्ट्रांचा विचार केला, तर त्यांच्या तुलनेमध्ये भारतात व्यावसायिक अभ्यासक्रमास शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण पाच टक्के इतके आहे. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी व्यावसायिक शिक्षण निवडलेले आहे. अशा विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये असंख्य अशा रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपला पूर्ण वेळ अभ्यासास देऊन आपले जीवन घडवावे.
या वेळी प्रमुख मार्गदर्शक प्रा.महेश पाटील, प्रशासकीय अधिकारी प्रा.महादेव साबळे, प्राचार्य अशोक बोडखे, उपप्राचार्य गजानन जाधव, विभाग प्रमुख प्रा.श्याम वाघ, प्रा.सुरेश गिनगिने, प्रा.अमोल मोरे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. प्रा.महेश पाटील यांनी आपल्या मनोगतात आजचा विद्यार्थी कसा घडावा, याबद्दल सखोल मार्गदर्शन केले. प्रास्ताविक प्राचार्य प्रा.अशोक बोडखे यांनी केले. सूत्रसंचालन गंधाला पुष्पांजली व सुनाक्षी कांबळे यांनी केले. प्राध्यापक गजानन जाधव यांनी आभार मानले.