जिंतूर-सेलू विधानसभा : काँग्रेसकडूनच मैदान गाजविणार : सुरेश नागरे यांचा निर्धार

जिंतूर-सेलू विधानसभा : काँग्रेसकडूनच मैदान गाजविणार : सुरेश नागरे यांचा निर्धार

सेलूमध्ये पत्रकार परिषदेत केली भूमिका स्पष्ट, विधानसभा जिंकण्याची तयारी सुरू

सेलू/परभणी : मी सेलू जिंतूर मतदारसंघात उभा राहणार नाही, अशा अफवा विरोधकांकडून पसरविल्या जात आहेत. महाविकास आघाडीमध्ये सेलू – जिंतूर मतदारसंघ काँग्रेसला सुटण्यासाठी आपण प्रयत्नशील असून, यामध्ये निश्चित यश मिळणार आहे. आणि जरी आघाडीतून कॉंग्रेसला मतदारसंघ सुटला नाही वा आघाडीही झाली नाही, तरी काँग्रेसकडून आपली उमेदवारी पक्की आहे, अशा ठाम विश्वासात्मक दावा प्रदेश कॉंग्रेसचे सचिव सुरेश कुंडलिकराव नागरे यांनी मंगळवारी, ८ ऑक्टोबररोजी सेलू येथे आयोजित पत्रकार परिषेदत केला.

५० हजारांच्या मताधिक्याने विजयाचा दावा

या वेळी परभणी जिल्हा कार्याध्यक्ष नानासाहेब राऊत, सेलू शहराध्यक्ष रहीमखॉं पठाण, महिला आघाडीच्या कमलताई लोखंडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी बोलतांना नानासाहेब राऊत म्हणाले की; एकविकासात्मक विचार घेऊन सुरेशराव नागरे जिंतूर-सेलू विधानसभेसाठी काँग्रेसचे उमेदवार राहणार आहेत. त्यांच्या उमेदवारीच्या धसकीने विरोधकांच्या पाया खालची वाळू सरकली असून अनेक अफवा पसरवल्या जात आहेत. परंतु, ५० हजारांच्या मताधिक्याने नागरे विजयी होतील . याच दृष्टिकोनातून कार्यकर्ते कामाला लागले आहेत.

त्यांनी’ केवळ टक्केवारी घेऊन स्वत:ची घरे भरली

मागील काळात निवडून आलेल्या उमेदवारांनी केवळ टक्केवारी घेऊन स्वतःची घरे भरल्याचा आरोप सुरेश नागरे यांनी यावेळी केला. सध्या चालू असलेले जिंतूर सेलूतील रस्तेकाम तसेच इतर रस्ते देखील महाविकास आघाडी सत्तेत असतांनाच मंजूर झालेले आहेत. ‘निवडून आलेल्या उमेदवारांनी अजूनही मतदार संघातील विकासात्मक कामे बाजूलाच ठेवली आहेत, असा टोला लगावला

विकासाचा समतोल साधणार

सेलू तालुक्यातील एमआयडीसी, बस डेपो, १३२ केव्ही वीज उपकेंद्र ही कामे गेल्या कित्येक वर्षांपासून रेंगाळत पडली आहेत. आमचे सरकार आले, तर निश्चित शैक्षणिक व विकासाचा समतोल साधण्याचा प्रयत्न केला जाईल. सेलू तालुक्यातील मतदार सुज्ञ आहेत. परंतु, जिंतूर तालुक्यात प्रत्येक घराघरात राजकारण शिरले असल्याने परिस्थिती थोडी वेगळी आहे. आजही तरुणांना रोजगाराच्या संधी नसल्यामुळे पुणे, मुबंईला जावे लागते. त्यामुळे भविष्यात मुबंई, पुण्याच्या धर्तीवर इकडे कशा संधी उपलब्ध करून देता येतील. यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत. सूत्रसंचालन शहराध्यक्ष रहीमखॉं पठाण यांनी केले. कार्यक्रमाला गणेशअण्णा नाईकवाडे, बाळासाहेब जोगदंड, राजेंद्र गाडेकर आदींसह कॉंग्रसचे पदाधिकारी, कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!