शिक्षक विजेंद्र धापसे यांची नूतन शाळेला संस्मरणीय भेट
दोन लाख रूपयांचा डिजिटल बोर्ड केला शाळेला प्रदान, संस्था पदाधिकाऱ्यांसह शिक्षकांची उपस्थिती
सेलू/परभणी : नूतन विद्यालयाचे माजी विद्यार्थी आणि सामाजिक शास्त्र विषयाचे विद्यमान शिक्षक विजेंद्र धोंडिबा धापसे यांनी मंगळवारी, ८ ऑक्टोबररोजी आयोजित एका छोटेखानी समारंभात दोन लाख रूपये किंमतीचा इंटरॅक्टिव्ह फ्लॅट पॅनल (डिजिटल बोर्ड) शाळेला प्रदान करीत संस्मरणीय भेट दिली आहे. श्री धापसे यांच्या सामाजिक दायित्वामुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण अधिक सुलभ आणि परिणामकारक होण्यास मदत होणार आहे. डिजिटल तंत्रज्ञान क्रांती युगात आणि बदलत्या शैक्षणिक प्रवाहात विद्यार्थी अधिक सक्षमपणे उभा राहावा, या उद्दात हेतूने श्री.धापसे यांनी ही भेट देणगी स्वरूपात देऊन शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे.
यानिमित्ताने नूतन विद्यालय सहकारी पतपेढी सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डॉ.एस.एम.लोया होते. याप्रसंगी संस्थेचे चिटणीस प्राचार्य डॉ.विनायकराव कोठेकर, सदस्य प्राचार्य डॉ.शरद कुलकर्णी, तंत्रज्ञ कल्याणकर, मुख्याध्यापक संतोष पाटील, उपमुख्याध्यापक के.के.देशपांडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. या वेळी बोलतांना प्राचार्य डॉ.कोठेकर म्हणाले की; नवनवीन तंत्रज्ञानाचा शैक्षणिक साधन म्हणून वापर करतांना अध्ययन-अध्यापन अधिक प्रभावी करता येते. त्याव्दारे विविध विषयातील संकल्पना विद्यार्थ्यांना अधिक स्पष्ट होण्यास निश्चित चांगली मदत होत असते. मात्र, शिक्षण ही एक कला आहे. जी प्रत्येक शिक्षकाने अवगत करणे आवश्यक आहे. त्यामुळे मूळ शिक्षकाला साधनं पर्याय ठरू शकत नाही. याची जाणीव ठेवून शिक्षकांनी आपापल्या विषयातील ज्ञानाच्या कक्षा, व्यासंग अधिक समृद्ध करून स्वत:ला सिद्ध करण्याची आणि सतत अद्ययावत ठेवण्याची नितांत गरज आहे. या वेळी डॉ.कोठेकर आणि अध्यक्ष डॉ.लोया यांनी श्री.धापसे यांच्या प्रकल्पाचे कौतुक करून पाठीवर शाबासकीची थाप देत त्यांचा यथोचित सत्कार केला. श्री.धापसे यांचा प्रकल्प प्रेरणादायी आहे. त्यादृष्टीने शिक्षकांनी संस्थेतील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्नरत राहावे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांसाठी डिजिटल बोर्डचा उपयोग कुशलतेने करावा, असेही मत या वेळी व्यक्त केले. श्री कल्याणकर यांनी डिजिटल बोर्डच्या उपयोगिता व वापराबाबत माहिती दिली. प्रास्ताविक मुख्याध्यापक पाटील यांनी केले. सूत्रसंचालन संतोष मलसटवाड यांनी केले. कार्यक्रमाला शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.
माझ्यासह माझे आजोबा बाबूराव, वडील धोंडिबा अशा तीन पिढ्यावर नूतन विद्यालय शिक्षण संस्थेने संस्कार केले. शिक्षण दिले. रोजगार दिला. याचे उत्तरदायित्व म्हणून आणि आधुनिक काळातील शिक्षणाची गरज ओळखून नूतन विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी डिजिटल बोर्ड उपलब्ध करून दिला आहे. याद्वारे शिष्यवृत्ती परीक्षा, एनएमएमएस परीक्षा, स्पर्धा परीक्षांसह शालेय सर्व विषयांचे अध्ययन-अध्यापन अधिक सुलभ व परिणामकारक व्हावे, हाच उद्देश आहे. संस्थेने व शाळेने या उपक्रमास प्रोत्साहन दिले आहे. अशी प्रतिक्रिया शिक्षक विजेंद्र धापसे यांनी दिली.