‘ज्ञानराधा’ घोटाळ्यातील मुख्य आरोपी ताब्यात
१६ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडीचे आदेश
प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यात सध्या मल्टिस्टेट बँकेच्या घोटाळा गाजत आहे. या प्रकरणात बीड, जालन्यासह छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यांत विविध पोलिस ठाण्यांत कोट्यवधी रुपयांच्या फसवणुकीबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या ज्ञानराधा मल्टीस्टेट बँक घोटाळा प्रकरणातील प्रमुख सूत्रधार ज्ञानराधा व तिरूमला उद्योग समूहाचा संस्थापक अध्यक्ष सुरेश ज्ञानोबा कुटे (वय ४८, रा. कुटेवाडी, ता. जि. बीड ह. मु. नवीन मोंढा-बीड) याच्यासह संचालक आशिष पद्माकर पाटोदेकर (वय ३२, रा. पाटोदा, ता. धाराशिव ह. मु. दक्षिण कसबा, दत्त कसबा सोलापूर) या दोघांना ग्रामीण पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले.
या प्रकरणात पैठण येथील व्यापारी मुकेश श्रीचंद पंजवाणी (वय ३८) यांनी दिलेल्या तक्रारीवरून ज्यादा व्याज देण्याचे आमिषाला बळी पडून ज्ञानराधा मल्टीस्टेट बँकेच्या पैठण शाखेत तालुक्यातील अनेक लोकांनी सुमारे पाच ते सहा कोटी रुपये गुंतवले आहेत. त्यातील ३२ व्यापाऱ्यांसह शेतकरी चाकरमान्यांनी सुमारे ३ कोटी २६ लाख ९३ हजार ३१३ रुपये गुंतवले असल्याची माहिती तक्रारीत देण्यात आली. ठेवींची मुदत संपूनदेखील खातेदारांची ठेवलेली ठेव परत मिळत नसल्याने तसेच ही शाखा पैठण मधून बंद केल्याने खातेदारांनी ज्ञानराधा बँकेविरुद्ध ५ महिन्यापूर्वी संस्थापक अध्यक्ष सुरेश कुटे व प्रमुख संचालक पत्नी अर्चना सुरेश कुटे यांच्यासह संचालक मंडळाविरुद्ध नऊ जून रोजी तक्रार दाखल केली होती. घोटाळ्याची व्याप्ती मोठी असल्याने ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग केला करण्यात आला. गुन्ह्याचा तपास सुरू असताना पोलिसांनी त्यांना अटक केली, तर बीड न्यायालयाने त्यांची पोलिस कोठडीनंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. आर्थिक गुन्हे शाखेने दोघांना बीड कारागृहातून ताब्यात घेत अटक केली. ही कारवाई ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखेचे सहाय्यक निरीक्षक सातोदकर यांच्या पथकाने केली.
♦पैठणमधील ९९ ठेवीदारांना १५ कोटीचा गंडा : ज्ञानराधा बँक घोटाळा प्रकरणी आत्तापर्यंत तीन आरोपींना अटक झालेली आहे. या तीन आरोपींसह एकूण २० जणांविरुद्ध पैठण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात आतापर्यंत ९९ ठेवीदारांचे जबाब नोंदविण्यात आले असुन सुमारे २३० ठेवीदारांचे परिशिष्ठ १ चे अर्ज भरण्यात आले आहेत. त्यानुसार १५ कोटी ८४ लाख ३ हजार ७५८ रुपयांची आर्थिक फसवणूक झाल्याची माहिती आतापर्यंत समोर आली आहे.
ज्ञानराधा
♦ सुरेश कुटेला कोर्टात केले हजर : ज्ञानराधा मल्टिस्टेटचा संचालक सुरेश कुटे व आशिष पाटोदेकर या दोघांना गुरुवारी (१० ऑक्टोबर) अतिरिक्त सत्र न्यायाधीश एस. एम. कोचे यांच्या कोर्टात हजर करण्यात आले. या दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता, सहाय्यक लोकाभियोक्ता शरद बांगर यांनी आरोपींनी गुन्हा गंभीर असून गुन्ह्याची व्याप्तीदेखील मोठी आहे. आरोपी हे तपासात सहकार्य करीत नसून कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देत नसल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले. बरोबरच आरोपींनी गुन्ह्यातील अपहारातली रक्कम कुठे गुंतवली, आरोपीचे कोणी साथीदार आहेत का याचा तपास करून आरोपींकडून ऑडिटची कागदपत्रे हस्तगत करायची असल्याने आरोपींना पोलिस कोठडी देण्याची विनंती न्यायालयाकडे केली होती. दोन्ही आरोपींना १६ ऑक्टोबरपर्यंत कोठडीचे आदेश दिले.
CR-Mata