शुभंकरोती फाऊंडेशन, के.बा.शाळेचा उपक्रम
सेलू : सेलू (जि.परभणी) येथील शुभंकरोती व देसाई फाऊंडेशन; तसेच श्री केशवराज बाबासाहेब विद्यालयातर्फे बुधवारपासून (चार मे) आयोजित उन्हाळी शिबिराला शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
उद्घाटक म्हणून उपविभागीय अधिकारी अरुणा संगेवार यांची उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष गोविंद जोशी होते. उपाध्यक्ष ॲड.लक्ष्मीकांत सुभेदार, सचिव महेश खारकर, सेलू पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक अंभोरे, अखिल भारतीय पत्रकार संघाच्या सेलू शाखेचे अध्यक्ष लक्ष्मण बागल, मुख्याध्यापक पी.एस.कौसडीकर, सुभाष नावकर ,अभिजीत बारडकर, दिलीप चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.
या वेळी मार्गदर्शन करतांना संगेवार म्हणाल्या, ” आयुष्यात मोठे होण्यासाठी सुप्त गुणांना वाव मिळणे आवश्यक आहे. वासंतिक (उन्हाळी) शिबिरे ही त्यासाठीची एक संधी आहे. विद्यार्थ्यांनी अशा संधीचे सोने केलं पाहिजे.” शुभंकरोती फाऊंडेशनच्या कार्याचा गौरव करून, शिबिरातील विविध उपक्रमांचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा, असे आवाहनदेखील संगेवार यांनी यावेळी केले. सृजनशीलतेला वाव देणारा एक स्तुत्य उपक्रम, अशा शब्दांत गोविंद जोशी यांनी संयोजकांचे कौतुक केले. पालकांनीदेखील शिबिरातील योगासारखे उपक्रम फायदेशीर ठरतील असे अंभोरे यांनी नमूद केले. अश्विनी घोगरे व संचाने स्वागत गीत सादर केले. सूत्रसंचालन योगेश ढवारे, तर प्रणाली थूल यांनी आभार मानले. सात मे पर्यंत चालणार्या या शिबिरात विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहेत. शिबीरार्थींसाठी अल्पोपहार, थंड पाणी व्यवस्था करण्यात आली होती. शिबिरासाठी फाऊंडेशनचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते, के.बा.विद्यालयातील शिक्षक परिश्रम घेत आहेत.