आम्रवन महाविहार : तथागत गौतम बुद्ध मूर्तीचा लोकार्पण सोहळा
देवगावफाटा आम्रवन महाविहार येथे रविवारी कार्यक्रम, उपस्थित राहाण्याचे आमदार मेघना बोर्डीकर यांचे आवाहन
प्रसिद्ध सिनेगायक आनंद शिंदे यांची भीम व शिवगीतांची मेजवानी
जिंतूर/परभणी : आमदार मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या स्वयं कल्पनेतून साकार झालेल्या आम्रवन महाविहार देवगाव फाटा येथे भव्य अशा तथागत गौतम बुद्ध यांच्या मूर्तीचा भव्य लोकार्पण सोहळा व धम्मदेशना कार्यक्रम रविवारी, २० ऑक्टोबररोजी संपन्न होणार आहे. या कार्यक्रमास जिंतूर-सेलू तालुक्यातील बौद्ध उपासक,उपसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन स्वागताध्यक्ष आमदार मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी केले आहे.
सकाळी ११ वाजता कार्यक्रम संपन्न होणार असून, या वेळी देवगाव फाटा ते आम्रवन महाविहार भव्य धम्म रॅलीचे आयोजन सुद्धा करण्यात आलेले आहे. तसेच प्रसिद्ध सिने गायक आनंद शिंदे यांचा भीम व शिवगीतांचा कार्यक्रम दुपारी तीन वाजता सादर होणार आहे. ध्वजारोहण सकाळी दहा वाजता संपन्न होईल व भोजन दुपारी एक ते तीन पर्यंत सुरू राहणार आहे.
जिंतूर सेलू तालुक्यातील समाज बांधवांची खूप दिवसांची मागणी होती की, देवगाव फाटा आम्रवन महाविहार येथे तथागतांची भव्य मूर्तीची स्थापना व्हावी, या सामाजिक मागणीची पूर्तता करत आमदार मेघना बोर्डीकर यांनी या कामास पूर्णरूप देत लोकार्पण सोहळा होत आहे.
या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून भदंत शरणानंद महाथेरो तसेच भदंत डॉ.उपगुप्त महाथेरो, पू.अतुरलीयरतन महाथेरो, यांच्यासह असंख्य पूज्य भिक्कु संघ उपस्थित राहणार आहे. तसेच यावेळी खासदार चिराग पासवान, खासदार रामदास आठवले, रावसाहेब दानवे, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे, पालकमंत्री संजय बनसोडे, प्रा.जोगेंद्र कवाडे, माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर यांची विशेष उपस्थिती राहणार आहे.