परतीचा पाऊस : निम्न दुधना, येलदरी धरणातून मोठा विसर्ग
परतीच्या पावसाने शेतपिकांचे मोठे नुकसान, सेलू-वालूर रस्त्यावरील वाहतूक ठप्प
परभणी : परभणी जिल्ह्यात सर्वत्र शनिवारी, १९ ऑक्टोबररोजी सायंकाळी व रात्री वीजेच्या कडकडाटासह झालेल्या परतीच्या पावसाने चांगलेच झोडपून काढले. मागील चोवीस तासात रविवारी, २० ऑक्टोबररोजी दुपारी पावणे तीन वाजेपर्यंत जिल्ह्यात सरासरी २६.३ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. सेलू तालुक्यात सर्वाधिक ४६.५ मिलीमीटर पाऊस झाला आहे. दरम्यान, सेलू तालुक्यातील ब्रह्मवाकडी येथील निम्नदुधना धरणाचे दहा दरवाजे शनिवारी रात्री दहा वाजल्यापासून टप्प्याने उघडून रविवारी सकाळी दहावाजेपर्यंत १६ हजार ७०० क्युसेक दराने विसर्ग दुधना नदीपात्रात सुरू करण्यात आला. यामुळे दुधना नदीला पूर आला आहे. राजवाडीजवळी पुलावर पाणी जात असल्याने सेलू-राजवाडी- वालूर रस्त्यावरील वाहतूक बंद झाली होती.
दरम्यान, पूर्णा पाटबंधारे प्रकल्पाच्या येलदरी (ता.जिंतूर) जलाशयाच्या सर्वच दहा दरवाजा द्वारे शनिवारपासून कमी अधिक प्रमाणात विसर्ग सुरू असून, रविवारी, २० ऑक्टोबररोजी सायंकाळी एकूण २३७०० क्युसेक विसर्ग पूर्णा नदीच्या पात्रात सुरु होता. यामुळे पूर्णा नदीही दुधडी भरून वाहत आल्याचे चित्र आहे.
शनिवारी सायंकाळी सातच्या सुमारास वीजेच्या कडकडासह जिल्ह्यात सर्वत्र पावसाने जोरदार हजेरी लावली. यामुळे अनेकांची तारांबळ उडाली. शेतात काढणीसाठी ठेवल्याने सोयबीनेचे भिजून नुकसान झाले आहे. दरम्यान, रविवारी सकाळी दहा वाजता निम्नदुधनाच्या दहा दरवाजातून १६ हजार ७०० क्युसेक दराने विसर्ग दुधना नदीपात्रात सुरू करण्यात आला. सायंकाळी सहा वाजता सहा दरवाजातून १०२०० क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरू होती. दरम्यान, मोठ्या विसर्गामुळे दुधना नदी पूर आला असून राजवाडी मार्ग वालूर रस्ता वाहतूकीसाठी बंद झाला होता. जिल्ह्यात रविवारी दुपारपर्यंत झालेला पाऊस ( मिलीमीटरमध्ये) या प्रमाणे – परभणी २५, गंगाखेड १२, पाथरी १४.५, जिंतूर ३२.५, पूर्णा ३६.५, पालम २२, सेलू ४६.५, सोनपेठ १२ आणि मानवत २०.२ मिलीमीटर.