विधानसभा निवडणूक : तीन उमेदवारांनी दाखल केले नामनिर्देशनपत्र
परभणी, जिंतूर, पाथरी विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी एक अर्ज
परभणी : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील गंगाखेड मतदारसंघ वगळता परभणी, जिंतूर, पाथरी विधानसभा मतदारसंघात प्रत्येकी एक अशा एकूण ३ उमेदवारांनी मंगळवारी (२२ ऑक्टोबर ) आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले असल्याची माहिती सहायक निवडणूक निर्णय अधिकारी जनार्दन विधाते यांनी दिली आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास आजपासून सुरुवात झालेली असून २९ ऑक्टोबर ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. ३० ऑक्टोबरला दाखल उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून ४ नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची अखेरची तारीख आहे.
९५ जिंतूर विधानसभा मतदारसंघात १८ उमेदवारांनी ३५ अर्ज घेतले. तर दिनकर धारोजी गायकवाड यांनी बहुजन रिपब्लीकन सोशलीस्ट पार्टीच्यावतीने नामनिर्देशन पत्र दाखल केले. ९६- परभणी विधानसभा मतदारसंघात २१ उमेदवारांनी ३० अर्ज घेतले. तर अ. पाशा अ.गफ्फार खुरेशी यांनी नॅशनॅलिस्ट काँग्रेस पार्टीच्यावतीने नामनिर्देशन पत्र दाखल केले. ९७- गंगाखेड विधानसभा मतदारसंघात १७ उमेदवारांनी २७ अर्ज घेतले. ९८- पाथरी विधानसभा मतदारसंघात १८ उमेदवारांनी ५२ अर्ज घेतले असून अब्दुल्ला खान लतीफ खान दुर्राणी (अपक्ष) यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केले.