श्रीरामकथा : उत्तम कथेतून प्राप्त ऊर्जा अनेक वर्षे पुरते : स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज

श्रीरामकथा : उत्तम कथेतून प्राप्त ऊर्जा अनेक वर्षे पुरते : स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज

सेलूमध्ये श्रीरामकथेची उत्साहात सांगता, श्रोत्यांची मोठी उपस्थिती

गुरूकृपेमुळे कार्य सिद्धीस :  राष्ट्रसंत स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज यांच्या श्रीराम कथेमुळे संपूर्ण शहर राममय झाले होते. गुरूकृपादृष्टीमुळे हे कार्य सिद्धीस गेले. अतिशय व्यस्ततेतून स्वामीजींनी सेलू शहरावरील प्रेमाखातर नऊ दिवसांच्या कथेसाठी उपस्थितीत राहून आपल्याला अमृतमय रसाची अनुभूती दिली. त्यामुळे मी कायम त्यांच्या ऋणात राहिल. शहरातील नागरिकांनी देखील मोठ्या संख्येने उपस्थित राहून कथा श्रवणाचा लाभ घेतला. विविध समित्या, समस्त सेलूकर, मित्र, सोयरे यांचे सहकार्य लाभले. सर्व सेलूवासीयच या रामकथेचे संयोजक होते, असा सर्वांनी सक्रीय सहभाग नोंदवून कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडला. त्या सर्वांमुळे बिहाणी परिवार धन्य झाला आहे, अशा शब्दांत आयोजक जयप्रकाश विजयकुमार बिहाणी यांनी सर्वांचेच ऋण व्यक्त केले.

https://sakashnews.com/?p=13588

सेलू/परभणी : कथा ही सांगायची नसते. या हृदयातून ती त्या हृदयात पोहोचवायची असते. संपूर्ण ऊर्जा मिळवायची असेल तर कथा ही कथा मंडपात ऐकल्याशिवाय संपूर्ण ऊर्जा मिळू शकत नाही. कारण उत्तम कथा हा एक प्रकारचा शक्तिपात असतो. त्यातून प्राप्त होणारी ऊर्जा मनुष्याला अनेक वर्षे पुरते, असे प्रतिपादन स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी केले आहे. बुधवारी, २३ ऑक्टोबर रोजी महाआरती व महाप्रसादाने नऊ दिवसांच्या रामकथेची उत्साहात सांगता झाली.

नूतन विद्यालयाच्या ‘हनुमानगढ’ परिसरात श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाचे कोषाध्यक्ष राष्ट्रसंत गोविंददेव गिरीजी महाराजांच्या अमृतवाणीतून १५ ते २३ ऑक्टोबर दरम्यान कथेचे आयोजन करण्यात आले होते. नवव्या दिवशी व्यासपीठावर श्रीसालासरजी (भक्त हनुमान) प्रतिकृती उभारण्यात आली होता. स्वामीजी म्हणाले की, उत्तम कथा हा एक प्रकारचा शक्तिपात असतो. त्यातून प्राप्त होणारी ऊर्जा मनुष्याला अनेक वर्षे पुरते. ती कथा भावूकतेच्या शिखरावरती पोहोचते. ऐकणारा श्रोता व बोलणारा वक्ता त्या भाव रसात बुडून जातात. बोलायचे देखील विसरतात. गोड भाषा माउलींनीच बोलावी. जगाच्या पाठीवर माऊली इतकी गोड भाषा कोणाची नाही. त्यांच्या भाषेने नेत्र वाहू लागतात. शब्द सुचत नाहीत. आणि अशीच कथाही सर्वोत्तम कथा असते, असे स्वामी गोविंददेवगिरीजी महाराज यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

सुखशांतीसाठी संस्कृती जपा

घराघरात रामराज्य येण्यासाठी प्रत्येकाचे जीवन राममय, कृष्णमय, शिवमय व्हावे. तरच सुखाचे सर्व मार्ग खुले होतील. आपली भारतीय संस्कृती जगात सर्वश्रेष्ठ आहे. त्यामुळे खऱ्या सुखशांतीसाठी आपली संस्कृती जपा, असे आवाहन राष्ट्रसंत स्वामी गोविंददेव गिरीजी महाराज यांनी आशीर्वाचनपर बोलताना केले.

तीर्थक्षेत्रांच्या अनुभूतीने भक्तिमय वातावरण

देशात ज्या नऊ ठिकाणी रामकथा सुरू असतात. त्याचे औचित्य साधून बिहाणी परिवारातील स्नुषा आणि त्यांच्या सखींनी साकारलेल्या नऊ दिवसांच्या अयोध्या धाम, तिरूपती बालाजी धाम, वृंदावन धाम, जगन्नाथ धाम, द्वारकाधिशधाम, श्रीक्षेत्र पंढरपूर धाम, श्री रामेश्वर धाम, श्रीबद्रीनाथ धाम, श्रीसालासरजी धाम आदी कलविष्काराने कथास्थळी त्या त्या धामची अनुभूती श्रोत्यांनी घेतली.

भाविकांचा उत्साह कायम

बिहाणी परिवारातर्फे आयोजित श्रीरामकथेसाठी गेल्या दोन महिन्यांपासून विविध समित्यांनी पुढाकार घेतला. दरम्यानच्या काळात पावसाने हजेरी लावली. तरीही नऊ दिवसही भाविकांचा उत्साह आणि ओढ कमी झाली नाही. आरती, भजनसंध्या यातही उत्साहाने भाविक सहभागी झाले. महिला, पुरूष, लहान बालके, ज्येष्ठ नागरिक , दिव्यांग श्रोत्यांची नियमितपणे मोठ्या संख्येने उपस्थिती होती. शिस्तीचे अनोखे दर्शन पाहायला मिळाले.

 

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!