राष्ट्रीय टेनिसव्हॉलीबॉल स्पर्धेत अजिंक्यपदासाठी चुरशीच्या लढती

२३ वी राष्ट्रीय मिनी, सबज्युनिअर टेनिसव्हॉलीबॉल स्पर्धा, नाशिक येथे आज समारोप

नाशिक : येथे सुरू असलेल्या २३ व्या मिनी आणि सब ज्युनिअर राष्ट्रीय टेनिस व्हॉलिबॉल स्पर्धेत महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेशच्या संघांनी दबदबा कायम राखीत विजयी घोडदौड सुरू ठेवली आहे. अंतिम सामन्यात अजिंक्यपदासाठी दिग्गज संघांमध्ये मोठी चुरस निर्माण झाली आहे. रविवारी ( आठ मे) स्पर्धेचा समारोप आहे.
टेनिस व्हॉलिबॉल फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या मार्गदर्शनाखाली, नाशिक जिल्हा टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशन, महाराष्ट्र असोसिएशन, अखिल भारतीय मराठा महासंघ आणि अस्मिता महिला मंडळ यांच्यातर्फे नाशिक विभागीय क्रीडा संकुल,आग्रा रोड, पंचवटी येथील इनडोअर हॉलमध्ये या स्पर्धांना शुक्रवारी (सहा मे) उत्साहात सुरुवात झाली.
कारगिल युद्धात देशाला विजयश्री मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेले मेजर नायक दीपचंद यांच्या हस्ते उद्घाटन झाले. प्रमुख पाहुणे म्हणून टेनिस व्हॉलीबॉल खेळाचे जनक डॉ.व्यंकटेश वांगवाड, कालिका देवी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष केशव पाटील, टेनिस व्हॉलीबॉल फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष आनंद खरे, खजिनदार धर्मेंद्र सिंग जडेजा, अखिल भारतीय मराठा महासंघाच्या डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ.उमेश मराठे, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त अशोक दुधारे, टेनिस व्हॉलिबॉल असोसिएशनचे राज्य सरचिटणीस गणेश माळवे (महाराष्ट्र), नागेश्वर राव (कर्नाटक), हद्रसिंग (दिल्ली) , नरसिंहम्मा (तेलगंणा), विजया (तामिळनाडू), आदींची उपस्थिती होती. डॉ.व्यंकटेश वांगवाड, डॉ.उमेश मराठे यांनीही मनोगत व्यक्त केले.प्रास्ताविक आनंद खरे यांनी केले. स्पर्धेत देशभरातील १८ राज्यांचे खेळाडू सहभागी झाले आहेत. ही स्पर्धा मिनी आणि सबज्युनिअर या दोन गटात खेळविली जात आहे. सबज्युनिअर मुले गटातील साखळी सामन्यात गुजरात, तेलगंणा, मणिपूर, यजमान महाराष्ट्र संघांनी विजयी होऊन बाद फेरीत प्रवेश केला, तर मुलीच्या गटात महाराष्ट्र संघाने आध्रंप्रदेश, मध्यप्रदेश संघाचा पराभव करत बादफेरीत प्रवेश केला . दुसऱ्या पुलमध्ये गुजरात संघाने कर्नाटक व तेलगंणा संघाचा पराभव करत बाद फेरी गाठली. मिनी मुले गटात उपांत्य फेरीत महाराष्ट्र विरुद्ध गुजरात, मध्यप्रदेश विरुद्ध कर्नाटक संघाने प्रवेश केला. मुलीच्या गटात महाराष्ट्र, गुजरात, आंध्रप्रदेश संघाची विजयी घोडदौड सुरू आहे. स्पर्धा इनडोअर हॉलमध्ये प्रकाश झोतात घेण्यात येत आहे. पंच प्रमुख म्हणून प्रफुल्ल कुमार बन्सोड, किरण घोलप, गणेश पाटील, अक्षय गामणे, सिध्दांत लिपने , शेनभगत , बंडू जमाधडे, नीलेश माळवे आदी काम पाहत आहेत.

“आम्ही जसे युद्धात पराक्रम गाजवून पाकिस्तानला नमवले; तसेच खेळाडूंनी आपल्या खेळाच्या माध्यमातून भारताचा तिरंगा जगभरात रोशन करावा. देशाचे नाव उज्ज्वल करावे.”

  • मेजर नायक दीपचंद

आज समारोप

२३ व्या मिनी व सब ज्युनियर राष्ट्रीय टेनिस व्हॉलिबॉल अजिंक्यपद स्पर्धेचा समारोप रविवारी (आठ मे) सकाळी अकरा वाजता आहे. अध्यक्षस्थानी विधान परिषद सदस्य आमदार डॉ.सुधीर तांबे, तर प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकचे (पूर्व) आमदार राहुल ठिकले, टेनिस व्हॉलिबॉलचे जनक डॉ.व्यंकटेश वांगवाड, दत्ता पाटील, नगरसेविका रूची कुंभारकर, आनंद खरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या वेळी विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती परभणी जिल्हा सचिव सतीश नावाडे यांनी दिली.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!