मतदानाचा टक्का वाढविण्यावर भर द्यावा

मतदानाचा टक्का वाढविण्यावर भर द्यावा

निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण फुलारी : जिंंतूरमध्ये मतदान जनजागृती कार्यक्रमांतर्गत बैठक

परभणी : लोकशाही बळकट आणि सक्षम करण्यासाठी निवडणुकीतील मतदान प्रक्रियेत मतदारांनी जागरूकतेने मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. यासाठी जनजागृतीद्वारे मतदानाची टक्केवारी वाढविण्यावर भर द्यावा, असे आवाहन ९५-जिंतूर विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी यांनी केले आहे.

भारत निवडणूक आयोग यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी रघुनाथ गावडे, जिल्हा स्वीप नोडल अधिकारी गणेश शिंदे, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी प्रवीण फुलारी, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेश सरवदे, डॉ.शिवाजी मगर, सुग्रीव मुंडे यांच्या नियोजनानुसार मतदार जनजागृती कार्यक्रम सुरू आहे. २२ ऑक्टोबर रोजी विविध शाळांतील मुख्याध्यापकांची बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी श्री.फुलारी, स्वीप नोडल अधिकारी त्र्यंबक पोले यांनी मार्गदर्शन केले.

चुनाव पाठशाळा, कॅम्पस अँबेसिडर, ईएलसी क्लबच्या माध्यमातून मतदान जनजागृती करण्यासाठी तालुक्यातील मुख्याध्यापक, प्राचार्य यांनी नियोजन करावे. घोषवाक्यांसह विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढावी, पालक सभेतून पालकांना मतदानाची शपथ द्यावी. विद्यार्थ्यांसमोर संकल्प पत्राचे सामूहिक वाचन करावे, पोस्टर स्पर्धा, निबंध स्पर्धा, गीत गायन स्पर्धा घेण्यात याव्यात. एनसीसी, एनएसएसच्या माध्यमातून नवमतदार आणि मतदारांमध्ये जनजागृती करावी. मानवी साखळी, मतदानाची गुढी, रिल्स स्पर्धा अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थी, पालक आणि समाज यांच्या सहभागातून जास्तीत जास्त मतदानाचा टक्का कसा वाढेल, यासाठी मुख्याध्यापक, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, शिक्षक, तलाठी, ग्रामसेवक, आरोग्य सेवक, अंगणवाडी कार्यकर्ती, आशा वर्कर, सर्व शासकीय कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन या वेळी करण्यात आले. उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांना शपथ देण्यात आली. या वेळी कस्तुरबा गांधी विद्यालयातील विद्यार्थिनींनी मतदान जनजागृतीपर पथनाट्य सादर केले. ज्ञानोबा साबळे, मंगेश नरवाडे, राजेंद्र ढाकणे, मयूर जोशी आदींची उपस्थिती होती.

Please Share

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!