‘मानवता’ वार्षिकांकाला प्रथम पुरस्कार
मानवतच्या के.के.एम.महाविद्यालयाचा अंक ठरला विद्यापीठातून सर्वोत्कृष्ट
परभणी : मानवत येथील के.के.एम.महाविद्यालयाच्या ‘मानवता’ या वार्षिकांकास नांदेडच्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठचा प्रथम पुरस्कार जाहीर झाला आहे. विद्यापीठ कार्यक्षेत्रातील महाविद्यालयाच्या वतीने प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या उत्कृष्ट वार्षिक अंकास प्रथम, द्वितीय व तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात येतो. यावर्षीच्या पुरस्कारासाठी एकूण २५० महाविद्यालयांनी सहभाग नोंदवला होता.
के.के.एम महाविद्यालयाच्या वतीने प्रत्येक वर्षी विविध विषयावर आधारित ‘मानवता’ हा वार्षिक अंक प्रसिद्ध करण्यात येतो. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे लेखन कौशल्य, संशोधक वृत्ती विकसित व्हावी यासाठी महाविद्यालयाच्या वतीने व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले आहे. संपादक मंडळात प्राध्यापक व विद्यार्थ्यांचाही समावेश असतो. २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात ‘लोकशाही समोरील आव्हाने’ या विषयावर विशेष अंक प्रसिद्ध करण्यात आला. यामध्ये विद्यार्थ्यांनी विविध मुद्द्यावर आधारित अभ्यासपूर्ण पद्धतीने लोकशाही समोरील आव्हाने मांडली. यामध्ये विद्यार्थ्यांच्या मराठी, हिंदी व इंग्रजी या तिन्ही भाषेमधील लेखाचा समावेश आहे. यापूर्वी प्रकाशित अंकास सलग तीन वर्षे प्रथम पुरस्कार मिळालेला आहे. संपादक म्हणून प्राचार्य डॉ.भास्कर मुंडे, कार्यकारी संपादक प्रा.डॉ.पंडित लांडगे, सदस्य डॉ.सचिन चोबे, डॉ.पवन पाटील यांनी काम पाहिले. अंतर्गत गुणवत्ता कक्षाचे डॉ.दुर्गेश रवंदे यांचेही मार्गदर्शन लाभले. प्रथम क्रमांक मिळल्याबद्दल पाथरी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष विजयकुमारजी कत्रुवार, सचिव बालकिशनजी चांडक, उपाध्यक्ष अनिलराव नखाते, रामचंद्रराव कत्रुवार, विजयकुमार दलाल, दिलीपराव हिबारे व संचालक मंडळाच्या सर्व सदस्यांनी विद्यार्थी आणि संपादक मंडळाचे अभिनंदन केले आहे.