आयुर्वेद व्यासपीठातर्फे धन्वंतरी जयंती उत्साहात
परभणी : गेली २६ वर्ष धन्वंतरी जयंतीनिमित्त आयुर्वेद व्यासपीठ शाखा परभणीच्या वतीने आरोग्यपर व्याख्यानांचे आयोजन करण्यात येते. यावेळेस २७ व्या वर्षी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे वैद्य मृत्युंजय शर्मा (नागपूर) यांचे ‘प्रकृती परीक्षण करी आरोग्य रक्षण’ या विषयावर रविवारी (२७ ऑक्टोबर) व्याख्यान झाले. यानिमित्ताने सौ.शांतादेवी वेदप्रकाश पाटील आयुर्वेदिक महाविद्यालय हट्टा येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेली ग्रंथ दिंडीने सर्वांचे लक्ष वेधले.
श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रताप काळे होते. उद्घाटक म्हणून पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी उपस्थित होते. तालुका आरोग्य अधिकारी डॉ.रावजी सोनवणे यांची उपस्थिती होती. व्याख्यानामध्ये डॉ.मृत्युंजय शर्मा यांनी वात, पित्त आणि कफ या तीनही प्रकृतींची वैशिष्ट्ये, त्यांनी पाळावयाची पथ्ये, आहार
विहार यांचे अतिशय अभ्यासपूर्ण शैलीमध्ये वर्णन केले. अध्यक्षीय समारोप अप्पर जिल्हाधिकारी डॉ. काळे यांनी केला.
कार्यक्रमाला जिल्हा पुरावठा अधिकारी गोविंद रणवीरकर, उपकोषागार अधिकारी नीलकंठ पाचंगे, आयएमए, आयडीएनिमा, फार्मसी असोसिएशन, एमआर असोसिएशन, एचडीए या संघटनांचे अध्यक्ष व प्रतिनिधी उपस्थित होते. यानिमित्ताने सौ.शांतादेवी
वेदप्रकाश पाटील आयुर्वेदिक महाविद्यालय हट्टा येथील विद्यार्थ्यांनी सादर केलेली ग्रंथ दिंडी हे आकर्षण ठरले. धन्वंतरी स्तवन डॉ.स्मिता कुलकर्णी यांनी, तर वक्ता परिचय डॉ.पूजा बाहेती यांनी करून दिला. प्रास्ताविक अध्यक्ष डॉ.विनोद पत्की यांनी केले. सूत्रसंचालन डॉ.साक्षी देशपाडे यांनी केले. विद्या भालेराव यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ.धीरज देशपाडे यांचे आरोग्यदान झाले. यावेळी केंद्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ.रवी भंडारी, डॉ.जयश्री कालानी, डॉ.शिरीष कळमनुरीकर, डॉ.दीपक करजगीकर यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उपाध्यक्ष डॉ मनोजकुमार दीक्षित, सचिव डॉ.गुरुदत्त चौधरी, डॉ.विवेक गुंडेवार, डॉ.कुणाल कौसडीकर, डॉ.संतोष वाईकर, डॉ.अमोल दीक्षित, डॉ.मुक्तेश्वर पारवे, डॉ.मेघना मुंदडा, डॉ.एकनाथ चोपडे, डॉ.अर्चना ढमढेरे, डॉ.पद्माकर फुटाणे आदींनी परिश्रम घेतले.