रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची माहिती
परभणी : मनमाडमार्गे आठवड्यातून दोनदा धावणार्या, नांदेड-हडपसर सुपरफास्ट रेल्वेचा विस्तार पुण्यापर्यंत करून ती आधुनिक कोचसह दररोज धावणार आहे, अशी माहिती केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी परभणी येथे दिली.
परभणी शहरातील दौऱ्यादरम्यान मराठवाडा रेल्वे प्रवाशी महासंघाच्या शिष्टमंडळाने दानवे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या वेळी माजी आमदार रामप्रसाद बोर्डीकर, आमदार मेघना बोर्डीकर, आनंद भरोसे, रेल्वे प्रवाशी महासंघाचे अरुण मेघराज, राजेंद्र मुंढे, प्रा.सुरेश नाईकवाडे, रितेश जैन, प्रवीण थानवी, रवीकिरण गंभीरे यांची उपस्थिती होती.
दानवे म्हणाले, ” मनमाड ते औरंगाबादपर्यंत दुहेरीकरणाला मंजुरी देण्यात आली असून, पुढील टप्प्यात औरंगाबाद ते परभणी दुहेरीकरणाचे कामदेखील पूर्ण करण्यात येणार आहे. जालना स्थानकावर पीट लाईनचे उद्घाटन पुढील महिन्यात होईल, तर औरंगाबाद येथेही एक पीटलाइन होणार आहे. पंढरपूर रेल्वेला कोणत्याही रेल्वे स्थानकावर बिनकामी उभे करू नये असे अधिकाऱ्यांना ठणकावून सांगितले. तसेच विभागातील सर्व रेल्वे गाड्यांचा लूज टाईम रद्द करण्यासोबत मुंबई-नांदेड राज्यराणी एक्सप्रेसला अतिरिक्त स्लीपर जोडण्याचे आदेश अधिकार्यांना दिले आहेत.” ( Authored by Team Sakash)