सहा आरोपीसह २२ दुचाकी ताब्यात
सेलू पोलिसांची कारवाई : दहा लाखांवर मुद्देमाल केला जप्त
सेलू : परभणी जिल्हा पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी, यांनी मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्याकरिता आरोपीतांचा शोध घेवुन त्यांचे विरुध्द कार्यवाही करण्याबाबत पोलीस निरीक्षकदीपक बोरसे यांना आदेशित केले होते. त्यानुसार सेलू पोलिसांनी कारवाई करीत सहा आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून वेगवेगळ्या कंपनीच्या २२ दुचाकीस १० लाख ४० हजार रूपयांचा मुद्दमाल जप्त केला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, दिनांक १७ ऑक्टोबर २०२४ रोजी पोलीस उपनिरीक्षक प्रमोद देशमुख, हे त्यांचे सोबत असणारे पोलीस अंमलदार यांचे सोबत सेलू पोलीस ठाणे हद्दीत शोध घेत असताना, अंदाजे रात्री दोन वाजेच्या दरम्यान सातोना रोड सेलू येथे दोन इसम वेगवेगळया मोटार सायकलवर जात असताना आढळले. त्यांना थांबण्याचा इशारा केला असता, ते न थांबता त्यांचे जवळ असणाऱ्या मोटार सायकल जागीच सोडुन पळ काढला. एक मोटार सायकलचे चेसीज क्रमांक घासुन खोडलेला आढळुन आला. सदर इसमांचा शोध घेत असताना मिळालेल्या गुप्त माहितीवरुन मोटार सायकल चोरी करणारा इसम इम्रान सत्तार शेख (वय २२ वर्ष रा.सातोना (खु) ता.परतुर जि. जालना) हा त्या रात्री मोटार सायकल चोरी करीत असताना पोलीसांना पाहुन पळुन गेलेबाबत खात्रीशीर माहितीवरुन सदर इसम यास ताब्यात घेण्यात आले. त्याचे ताब्यातून सुरवातीस विनाकागदपत्राच्या ३ मोटार सायकल हस्तगत केल्या. सदर इसमास ताब्यात घेवुन अधिक तपास केला असता, त्याने व त्याचे इतर ५ साथीदार यांनी मिळुन सेलू, मानवत, कोतवाली, सोनपेठ, मंठा, आष्टी, परतुर अशा ठिकाणावरुन एकूण २२ मोटार सायकल (किंमती १०,४०,०००/-रु) चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने सदरच्या मोटार सायकल जप्त करण्यात आल्या. यातील एकूण सहा आरोपीतांना अटक करण्यात आलेली आहे.
पोलीस अधिक्षक रविंद्रसिंह परदेशी यांच्या नेतृत्वात अप्पर पोलिस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोलीस अधिक्षक जीवन बेनिवाल, उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार केंद्रे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक दिपक बोरसे, पोउपनि प्रमोद देशमुख, पोलीस अंमलदार सुधाकर तेलंगे, ज्ञानेश्वर जानगर, माधव कांगणे, अजय रासकटला, माधव गोरे, अशोक वायाळ व तांत्रिक सहाय्य सायबर सेलचे पोलीस अंमलदार गणेश कौटकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोउपनि प्रमोद देशमुख हे करीत आहेत. आरोपीची नावे अशी -इम्रान सत्तार शेख (वय २२ वर्ष रा. सातोना (खु) ता. परतुर जि.जालना), विशाल यशवंत पवार (वय १९ वर्ष रा.साईनगर,परतूर जि.जालना), ओम फकिरा पवार (वय २२ वर्ष रा.साईबाबा मंदिर जवळ परतूर), करन संजु पड्डुळकर ( वय २२ वर्ष रा.आष्टी रोड परतूर), आसेफ पाशा शेख (वय २४ वर्ष रा. ज्ञानेश्वर नगर, परतूर), सचिन राजेभाऊ शिंदे (वय २२ वर्ष रा.सातोना (खु) ता.परतुर)