शक्तिप्रदर्शन रॅलींनी मंगळवार दणाणला
परभणीतील चारही विधानसभा मतदारसंघात प्रमुख पक्षाच्या उमेदवारांचे जोरदार शक्तिप्रदर्शनात अर्ज दाखल
परभणी : विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील परभणी, गंगाखेड, जिंतूर, पाथरी या चारही मतदार संघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी, २९ ऑक्टोबररोजी प्रमुख पक्षांच्या उमेदवारांनी रॅलीव्दारे जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केले. परभणी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार डॉ.राहुल पाटील यांनी मंगळवारी जोरदार शक्तिप्रदर्शन करीत उमेदवार अर्ज दाखल केला. युवा सेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची रॅलीतील उपस्थिती लक्षवेधी ठरली. खासदार संजय जाधव, खासदार फौजिया खान यांच्यासह महाविकास आघाडीतील विविध घटक पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते, समर्थक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील महायुती पुरस्कृत, राष्ट्रीय समाज पक्षाचे उमेदवार आमदार डॉ.रत्नाकर गुट्टे यांनी मंगळवारी गंगाखेडमध्ये जोरदार रॅली काढून शक्तिप्रदर्शन केले. राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्यासह अन्य पदाधिकारी व समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. पाथरी विधानसभा मतदार संघात काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार सुरेश वरपुडकर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे माजी आमदार बाबाजानी दुर्राणी व राष्ट्रीय समाज पक्षाचे सईद खान या तिन्ही तुल्यबळ उमेदवारांनी मंगळवारी पाथरीत जोरदार शक्तिप्रदर्शने करीत शहर दणाणून सोडले. जिंतूर विधानसभा मतदार संघात महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस शरदश्चंद्र पवार पक्षातर्फे माजी आमदार विजय भांबळे यांनी जोरदार रॅलीद्वारे आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरदश्चंद्र पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांच्यासह महाविकास आघाडीतील विविध घटक पक्षातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.