‘ज्ञानसाधना’ चे प्रा.किरण सोनटक्के यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव
अभीष्टचिंतन सोहळ्यात विविध क्षेत्रातील मान्यवरांकडून सत्कार
परभणी : धर्मापुरी येथील ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या वतीने राबविण्यात येत असलेले विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम, कार्यक्रम, प्रकल्प, योजना विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने उपयुक्त ठरल्या आहेत. याद्वारे सामाजिक उत्तरदायित्व आणि भान जपण्याचा प्रयत्न प्रतिष्ठानच्या वतीने सातत्याने केला जात आहे, असे प्रतिपादन प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष तथा शिक्षक मित्र प्रा.किरण सोनटक्के यांनी केले आहे. रविवारी, २७ ऑक्टोबर रोजी प्रा.किरण सोनटक्के यांचा वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रा.किरण सोनटक्के यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला.
अध्यक्षस्थानी शिवसांभ सोनटक्के होते. याप्रसंगी गंगाबाई सोनटक्के, प्रा.शितल सोनटक्के, केशवअण्णा दुधाटे, गोपाळराव भुसारे, साईनाथ महाराज वसमतकर, नारायणराव चौधरी, अशोक आप्पा धुळे, सुनील तुरुकमाने आदींची प्रमुख उपस्थिती होती. प्रारंभी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचे; तसेच महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांचे पूजन आणि दीपप्रज्वलन झाले. या वेळी संस्थेतील सर्व शाखेतील विभागाच्या वतीने प्रा.सोनटक्के यांचा सत्कार करण्यात आला. प्रास्ताविकात प्रा.शितल सोनटक्के यांनी प्रा.किरण सोनटक्के यांच्या संघर्षमय जीवनप्रवासावर प्रकाश टाकला. सूत्रसंचालन श्री.दडके यांनी केले. एम.पी.भोपळे यांनी आभार मानले. यानिमित्ताने आयोजित स्वरनिनाद संगीत मैफिलीला श्रोत्यांची उत्स्फूर्त दाद मिळाली. दरम्यान, आमदार डॉ.राहुल पाटील, नंदकिशोर शिवाचार्य महाराज सोनपेठकर यांच्यासह विविध सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा साहित्य क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थित राहुन प्रा.सोनटक्के यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी गयाबाई भालेराव, उमादेवी धुळे, सुनील जाधव, रणजीत काकडे, वसंतराव देशमुख आदींसह ज्ञानसाधना प्रतिष्ठानच्या विविध विभागातील शिक्षक, कर्मचारी, पालक आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.